जळगावात वादळामुळे वीजपुरवठा खंडीत होऊन पाणीपुरवठा न झाल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:51 PM2018-03-21T12:51:58+5:302018-03-21T12:51:58+5:30
बुधवारी पुरवठा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २१ - सोमवारी रात्री झालेल्या वादळामुळे कुसुंबा परिसरात वीज वाहिनीवर झाड पडून वीज पुरवठा खंडीत झाल्याने मंगळवारी शहरात पाणीपुरवठा होऊ शकला. त्यामुळे मंगळवारी होणारा पाणीपुरवठा आता बुधवारी होणार असून एक-एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी दिली.
सोमवारी रात्री वीज वाहिनीवर झाड पडल्यानंतर रात्री एक वाजताच मनपाचे व वीज कंपनीचे कर्मचारी तेथे पोहचले. संपूर्ण काम पहाटे पाच वाजले व त्यानंतर पाण्याच्या टाक्या भरण्यास दुपारी १२ वाजले. शहरात मंगळवारी होणाऱ्या सर्व भागात पाणीपुरवठा करणे शक्य नव्हता त्यामुळे एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकल्याची माहिती खडके यांनी दिली.
या भागात होणार बुधवारी पाणीपुरवठा
जुने जळगाव, सिंधी कॉलनी, नवी पेठ, शनिपेठ, बळीराम पेठ, शाहूनगर, रिंग रोड, नटराज टॉकिज परिसर, गेंदालाल मिल परिसर, आदर्शनगर, समतानगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनीचा काही भाग.
झाडे उन्मळली, ठिकठिकाणी पाण्याचे डबके
सोमवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरात झाडे उन्मळून पडण्यासह बॅनर फाटले तर बºयाच ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. या पावसामुळे काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक दरम्यान हॉटेलजवळ एक वृक्ष उन्मळून पडला. त्याच्याच समोर विरुद्ध बाजूला पेट्रोलपंप शेजारीदेखील झाड पडले. ओंकारेश्वर मंदिराच्या भींतीवर झाडाच्या फांद्या पडल्या. सुदैवाने यात काही नुकसान झाले नाही.
फलक फाटले
स्वातंत्र चौकात लावण्यात आलेले फलक फाटण्यासह मनपाच्या १७ मजली इमारतीजवळदेखील मोठे बॅनर खाली पडले.
पाण्याचे डबके
दाणाबाजारात गेल्या वर्षी गटारीवर ढाप्याचे काम केल्यानंतर तो भाग उंच झाला असून सोमवारी झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी पाणी साचले. यामुळे दुकारदारांचे व ग्राहकांचेही हाल झाले. या सोबतच बी.जे. मार्केट, १७ मजली इमारतीजवळ तसेच आकाशचौकातही पाणी साचले होते.