लॉकडाऊनमुळे जळगाव आगाराच्या ३० टक्केच फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:22+5:302021-03-29T04:11:22+5:30
अत्यल्प प्रतिसाद : कोरोनामुळे मध्यप्रदेश नंतर गुजरातकडेही जाणाऱ्या बसेस बंद लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे जिल्ह्यात तीन दिवसांच्या ...
अत्यल्प प्रतिसाद : कोरोनामुळे मध्यप्रदेश नंतर गुजरातकडेही जाणाऱ्या बसेस बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे जिल्ह्यात तीन दिवसांच्या जाहिर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महामंडळाच्या चांगलाच परिणाम झाला. जळगाव आगारातून दिवसभरात ३० टक्के फेऱ्या झाल्या असून, दुसरीकडे गुजरात मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आल्यामुळे, जळगाव आगारातून गुजरातकडे जाणाऱ्या बसेस बंद करण्यात आल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे तीन दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये सर्व बाजारपेठा व उद्योग बंद ठेवून कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाभरात हा लॉकडाऊन असल्याने रविवारी दुपारी बारापर्यंत बोटावर मोजण्या इतक्याच बसेस बाहेर गावी रवाना झाल्या.यात बहुतांश बसेस या लांब पल्ल्यावरच्या होत्या. तर जिल्हयातील इतर आगाराहूनही मोजक्याच जळगावला आल्या असल्याचे सांगण्यात आले. सध्या कोरोना काळात जळगाव आगारातून दररोज ३०० ते ३५० फेऱ्या होत असून, रविवारी फक्त ५० ते ६० फेऱ्या झाल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
गुजरातकडे जाणाऱ्या बसेस बंद
गुजरात सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मध्ये बसेसने येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा कोरोना निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे गरजेचे आहे.तरच त्यांना प्रवेश देण्यात येत आहे. त्यानुसार जळगाव आगारातूनच गुजरात राज्यातील सुरत, सेलवास, वापी या ठिकाणी बस निघतांना जळगाव स्थानकावरच प्रवाशांकडे या चाचणीचा अहवाल पाहण्यात येत आहे. मात्र, एकाही प्रवाशांकडे या चाचणीचा अहवाल नसल्याचे सांगण्यात आले.