लॉकडाऊनमुळे पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या फेऱ्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:16 AM2021-04-24T04:16:15+5:302021-04-24T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे शहरातील विविध कंपन्यांच्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. तर दुसरीकडे जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू असून, शुक्रवारी बसमध्ये शासनाच्या सूचनेनुसार २२ प्रवासी न मिळाल्याने बोटावर मोजण्याइतक्याच प्रवाशांना घेऊन या बसेस बाहेरगावी रवाना होताना दिसून आल्या.
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गुरुवारी रात्रीपासून लागू केलेल्या संचारबंदीत अधिकच कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये आंतरजिल्हा प्रवासाला बंदी करण्यात आली असून, सरकारी सेवेसह खाजगी प्रवासी वाहतूक सेवेत ५० टक्केच प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आंतरजिल्हा प्रवासासाठी संबंधित प्रवाशाला प्रवासासाठी शासनाच्या परवानगीचा पास सोबत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पर जिल्ह्यात जातांना ॲन्टिजेन चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट सोबत ठेवणेही गरजेचे केले आहे. शासनाने ३० तारखेपर्यंतच्या लॉकडाऊनमध्ये अतिशय कडक नियम लागू केल्याने याचा परिणाम सरकारी प्रवासी वाहतूक सेवेसह खासगी प्रवासी वाहतूक सेवेवरही झाला आहे. त्यामुळे जळगाव शहरातून नियमित पुणे व मुंबईला सेवा देणाऱ्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांनी आपल्या सेवा ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
इन्फो :
पुणे व मुंबईकडे जाणाऱ्या १०० ते १२५ ट्रॅव्हल्स बंद
जळगाव शहरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी दररोज ५० ते ६० ट्रॅव्हल्स जात असतात आणि तिकडूनही तितक्याच ट्रॅव्हल्स जळगावला येत असतात. दोन्ही मार्गांवर १०० ते १२५ ट्रॅव्हल्स धावत असतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवल्या आहेत. या बंदमुळे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याच्या भावना शहरातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. दरम्यान, शासनाच्या नियमांचे पालन करीत शहरातील फक्त दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे पुण्याची सेवा चालविण्यात येत असल्याचे सांगितले.
इन्फो :
शासनाने ट्रॅव्हल्समध्ये ५० टक्के प्रवाशांची केलेली सक्ती, तसेच प्रवाशांना जिल्हा अंतर्गत प्रवासाला केलेली बंदी, त्यात ॲन्टिजेन चाचणीची सक्ती यामुळे प्रवाशांकडूनच अल्प प्रतिसाद आहे. त्यात ट्रॅव्हल्स मध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेप्रमाणे वाहतूक करणे आम्हाला परवडणार नाही. त्यामुळे शहरातील बहुतांश ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी ३० एप्रिलपर्यंत ट्रॅव्हल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रमोद झांबरे, सचिव, जळगाव जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशन.
इन्फो :
तर बसेसला २२ प्रवासीही मिळेना
संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर महामंडळातर्फे सध्या जिल्हा अंतर्गतच अत्यावश्यक सेवेसाठी बससेवा सुरू आहेत. तसेच या बसेसमध्येही शासनाच्या सूचनेनुसार शुक्रवारपासून ५० टक्केच प्रवासी आसन क्षमता निश्चित करण्यात आली आहे. मात्र, शुक्रवारी जळगाव आगारातून मुक्ताईनगर, जामनेर व धुळे येथे रवाना होणाऱ्या बसेसमध्ये ५० टक्के क्षमतेनुसार २२ प्रवासीही बसलेले आढळून आले नाहीत. बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी प्रवास करताना आढळून आले.