मेगाब्लॉकमुळे मुंबईकडून येणाऱ्या गाड्या दोन तास लेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:10 AM2021-05-03T04:10:56+5:302021-05-03T04:10:56+5:30
गैरसोय : जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने जळगाव : मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ...
गैरसोय : जळगावहुन मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने
जळगाव : मुंबई विभागातील आटगाव रेल्वे स्टेशनजवळ गर्डर टाकण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने रविवारी पहाटे घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्यांचा चांगलाच खोळंबा झाला. मुंबईवरून येणाऱ्या गाड्या दोन तास आणि जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही एक ते दीड तास विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनातर्फे खडवली आणि आटगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील मर्यादित उंचीचे सबवे (एलएचएस) च्या आरएच गर्डर टाकण्यासाठी शनिवारी रात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला होता.
शनिवारी मध्यरात्री २.१५ पासून ते रविवारी सकाळी ०७. २५ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात आला होता. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटणारी आदिलाबाद एक्स्प्रेस व सिकंदराबाद एक्स्प्रेस या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच काही गाड्या सुरत मार्गे वळविण्यात आल्या होत्या. दरम्यान, मध्य रात्रीच्या या ब्लॉकमुळे तुरळक गाड्यांवरच परिणाम झाला असला, तरी ऐन कडक उन्हाळ्यात या गाड्या विलंबाने धावल्यामुळे आरोग्यावरही परिणाम झाला असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
इन्फो :
काशी, गीतांजली व कामाख्या एक्स्प्रेस दोन तास लेट
या ब्लॉकमुळे रविवारी सकाळच्या सत्रातील मुंबईकडून जळगावकडे येणाऱ्या गाड्या दोन तासांपर्यंत विलंबाने धावल्या. यामध्ये काशी एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, कामाख्या एक्स्प्रेस या तिन्ही सुपरफास्ट गाड्या दोन तास विलंबाने धावल्या. प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली गीतांजली एक्स्प्रेस तिच्या निर्धारित वेळेनुसार जळगावला दुपारी १२ वाजता पोहोचण्याऐवजी दुपारी दोन वाजता पोहोचली तर कामाख्या एक्स्प्रेस दुपारी दीड वाजता पोहोचण्याऐवजी जळगावाला सव्वा तीन वाजता तर काशी एक्स्प्रेसही सव्वा तीन वाजता पोहोचली. परिणामी, यामुळे जळगाव रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबून असलेल्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
इन्फो :
मुंबईकडे जाणाऱ्या गाड्याही विलंबाने
रविवारी या ब्लॉकचा परिणाम जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरही झाला. यामध्ये
जनता एक्स्प्रेस दोन तास लेट, गरीबरथ एक्स्प्रेस एक तास व सेवाग्राम एक्स्प्रेसही एक तास लेट धावली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय झालेली दिसून आली.