पुरुषांच्या दुर्लक्षामुळे मुलांना ‘जंक फूड’ ची सवय - आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:10 PM2018-11-28T12:10:23+5:302018-11-28T12:10:45+5:30
योग्य आहारासह वेळेची सांगड घालावी
जळगाव : स्वयंपाक घराकडे पुरुषांचे दुर्लक्ष झाल्याने मुलांना ‘जंक फूड’ खाण्याची सवय लागली असल्याचे मत प्रसिद्ध आहार तज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे २५ नोव्हेंबर रोजी ‘आरोग्यम् धनसंपदा’ या कार्यक्रमाचे आयोजन जळगावात करण्यात आले होते. आहार कसा असावा याबाबत त्यांच्याशी ‘लोकमत’ने बातचीत केली. यावेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला हा संवाद....
आपल्या वेळेनुसार प्रत्येकाने आहाराचे नियोजन करावे
दिवेकर म्हणाल्या, आज नोकरी, व्यवसाय करताना त्याचे स्वरुप दिवसेंदिवस बदलत आहे. त्यामुळे आपल्या वेळेनुसार प्रत्येकाने आहाराचे नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ वजनवाढ न पाहता योग्य आहार व वेळ यांची सांगड घातली पाहिजे. घरचा आहार घेतल्यास स्थूलपणा, वजनवाढ कमी होईल. तसेच सध्या लहान मुलांना जंक लूड अधिक आवडते़ पालकांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायला हवे़ आहारात फळांचाही अधिक वापर असावा.
लहान मुलांच्या आहाराबाबत त्या म्हणाल्या, लहान मुलांना आजकाल जंक फूड जास्त आवडते. त्याला आळा बसण्याऐवजी त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. हे प्रकार घातक आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा विचार करावा व शासनाने या प्रकारास वेळीच आळा घातला पाहिजे.
आजकाल वेळेअभावी अनेक जण बाहेरून खाद्य पदार्थ आणतात व तोच आहार घेतला जातो. मात्र पालकांनी या बाबत दक्षता बाळगली पाहिजे. पूर्वी आजोबा असो वा घरातील पुरुष यांचे स्वयंपाक घराकडे लक्ष असायचे. आता पुरुषांचे त्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्याने मुले जंक फूडच्या आहारी जात आहे. असेही त्यांनी सांगितले़