कोजागिरीच्या दुधाला यंदाही ‘गतवर्षाचा’च गोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 04:41 PM2017-10-04T16:41:49+5:302017-10-04T16:43:20+5:30
भाव स्थिर : दिवाळीनंतर वाढतील दर
जिजाबराव वाघ/लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, जि.जळगाव, दि.4 : आल्हाद गारवा.. शुभ्र चांदणे.. गप्पांची मैफल.. कुठे डिजेची धमाल तर कुठे गाण्यांच्या भेंडय़ा.. सोबतीला जिभेवर रेंगाळणा:या गरमा गरम दुधाचा घोट.. चटपटीत भेळ आणि गरम भजीचाही बेत.. कोजागिरीची रात्र दरवर्षीच अशी यादगार ठरते. जीएसटी, नोटबंदी, पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी संकटांची मालिका असतानादेखील यंदा दुधाची धार आटली नाही. भाव स्थिर असल्याने यंदाही कोजागिरीच्या दुधातून गतवर्षाचा गोडवा चाखता येणार आहे. खान्देशात शेती व्यवसायाला पशुपालनाची जोड असल्याने दूध-दुभत्यामुळे समृद्धता आली आहे. एकेकाळी हा परिसर दूधगंगा म्हणून ओळखला जायी. कालौघात यात बदल झाले असून पशुपालन करताना पशुपालकांना अडचणींना भिडावे लागले. त्यामुळेच दुधाचा ओघ काहीअंशी कमी झाला आहे. यंदा खान्देशात पावसाने अद्यापही सरासरी ओलांडली नाही. शेजारच्या नाशिक जिल्ह्यात मात्र त्याने भरभरून माप दिले. दुधाच्या व्यवसायावर चारा आणि पाणी या दोन घटकांचा मोठा परिणाम होतो. सद्य:स्थितीत दुधाचे दर स्थिर आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात अल्पशीही वाढ झालेली नाही. चाळीसगावची दुधगंगा तेजीत संपूर्ण राज्यात चाळीसगाव दूधगंगा म्हणून ओळखले जाते. 1990 मध्ये परिसरात धवल क्रांतीच झाली. मुंबईर्पयत दुधगंगेने सीमोल्लंघन केले होते. तथापि, गेल्या काही वर्षात येथील दुध व्यवसायासमोर संकटांची रांग लागली. आजमितीस येथील व्यवसाय अस्तिव टिकवण्यासाठी धडपडतो आहे. गेल्या काही वर्षात कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे दर वधारणे हे समीकरण झाले आहे. यंदा मात्र अपवाद ठरला असून, मागील वर्षीच्या भावातच दूध खरेदी करून कोजागिरी साजरी करण्याचा आनंद घेता येणार आहे. गेल्या वर्षी पावसाने सरासरी पूर्ण केली असतानाही दुधाचे दर प्रति लीटर पाच रुपयांनी वधाराले होते हे विशेष. 43 रुपये प्रतिलीटर भाव चाळीसगाव परिसरात अपूर्ण पर्जन्यमान झाले आहे. जनावरांच्या चारा समस्येने अद्याप डोके वर काढले नसले तरी दिवाळीनंतर हा प्रश्न ऐरणीवर येईल. म्हशीच्या दुधाचे घाऊक दर प्रति लीटर 43 तर किरकोळ भाव 60 रुपये आहे. गायीच्या दुधालादेखील तेजी असून, हे दर 40 रुपये घाऊक, तर 45 रुपये किरकोळ असे आहेत. गेल्या वर्षी हेच भाव असल्याने कोजागिरी चाहते आणि गरमागरम दुधावर ताव मारणा:यांना दुधाचे दर स्थिर असल्याने गोडवा चाखता येणार आहे. मसाला दूध 100 रुपये प्रति लीटर चांदणं प्रकाशात भट्टी पेटवून गाण्यांच्या चालीवर दूध आटवण्याची मजा काही औरच. त्यातही घरच्या गच्चीवर किंवा अंगणात असे बेत जल्लोषी आणि कल्ला करणारे ठरतात. तथापि, नागरिकांवर रेडीमेड आणि ऑनलाईनची भुरळ असल्याने मसाला दुधालाही मागणी वाढली आहे. तयार मसाला दुधाचे दर प्रति लीटर 100 रुपये आहेत. एक ते दोन दिवस अगोदर ऑर्डर देऊन असे दूध हे दूध डेअरीवाले बनवून देतात. गतवर्षीच्या तुलानेत यंदा दुधाची मागणी कमी असल्याचे नंदन दुग्धालयाचे राजेंद्र कोतकर यांनी सांगितले.