मतदार स्लीपचे वाटपच न झाल्याने जळगावात मतदारांमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:23 AM2019-04-23T10:23:32+5:302019-04-23T10:24:58+5:30
जळगाव - जळगावात शहरात मंगळवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी मतदार स्लीपच वाटप न झाल्याने मतदारांचा ...
जळगाव - जळगावात शहरात मंगळवार सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र अनेक ठिकाणी मतदार स्लीपच वाटप न झाल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. तर दुसरीकडे मतदान केंद्रांबद्दल माहिती नसल्याने या गोंधळात चांगलीच भर पडली.
जळगावात अनेक ठिकाणी मतदार स्लीप वाटप न झाल्याने त्यामुळे मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन आपला क्रमांक शोधावा लागत होता. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर काही ठिकाणी गर्दी झाली होती. मतदारांची रिक्षाने ने- आण करण्यावरुन आव्हाणे ता. जळगाव येथे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. पोलिसांनी मध्यस्थी करीत हा वाद मिटविला.
जळगावात सकाळी आमदार सुरेश भोळे, त्यांच्या पत्नी आणि महापौर सीमा भोळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
माजी मंत्री सुरेशदादा जैन त्यांच्या पत्नी रत्नाभाभी जैन, पुत्र राजेश जैन यांनी शिवाजीनगर भागातील मतदान केंद्रावर मतदान केले.
जळगावातील रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सचे संचालक रतनलाल बाफना यांनी व्हीलचेअर येऊन मतदानाचा हक्क बजावला.
कोथळी ता. मुक्ताईनगर येथे भाजप नेते आमदार एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी व महानंदच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, भाजप उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी मतदान केले.
दरेगाव ता. चाळीसगाव येथे भाजप उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांनी वडिल भैय्यासाहेब पाटील, पत्नी संपदा पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय यावलचे आमदार हरिभाऊ जावळे, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.