चोपडा येथे उसाचे पैसे मिळत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 01:05 PM2018-05-10T13:05:08+5:302018-05-10T13:05:08+5:30
बैठकीतच नेत्यांसमोर शेतकरी कृती समितीच्या मुख्य प्रवर्तकाने अंगावर ओतले रॉकेल
आॅनलाइन लोकमत
चोपडा, जि. जळगाव, दि. १० - तालुक्यातील चहार्डी येथील चोपडा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना उसाचे पैसे काट्याखाली देण्याची बोली करूनसुद्धा पाच महिने लोटल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने संतापलेले शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत सुरू असलेल्या बैठकीत सोबत आणलेल्या रॉकेलच्या बाटलीमधील रॉकेल अंगावर ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र उपस्थितांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या वेळी पाटील यांचे हे कृत्य पाहून सर्वपक्षीय नेते तसेच अरुणभाई गुजराथी देखील भांबावले.
‘चोसाका’स तालुक्यातील शेतकºयांनी ऊसपुरवठा केला होता. त्यांना पैसे देण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेते चेअरमन आणि शेतकरी यांची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सुरू असताना सकाळी दहाला हताश झालेले शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी. पाटील यांनी पैसे मिळणार नसल्याचे समजल्याने विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी आणि चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील यांच्या डोळ्यांदेखत अंगावर रॉकेल ओतले. त्यानंतर मात्र स्वत: अरुणभाई गुजराथी आणि कैलास पाटील यांनी पाटील यांना सावरण्याचा प्रयत्न केला व त्यांच्या हातातील बाटली काढून घेतली. या वेळी चोसाका चेअरमन अतुल ठाकरे, संचालक जितेंद्र पाटील, संचालक आनंदराव रायसिंग, प्रभारी कार्यकारी संचालक आधार पाटील आणि शेतकºयांपैकीे नारायण पाटील, संजीव सोनवणे, मुकुंद पाटील, नितीन निकम, गुलाबराव निकम, गोविंदा दामू चौधरी, नारायण साधू कोळी, विनायक बिºहाडे, पंचक येथील तुकाराम हेमा पाटील यांच्यासह इतर शेतकरी चर्चेच्या वेळी उपस्थित होते.
सर्वपक्षीय नेते, चेअरमन अतुल ठाकरे, संचालक मंडळ आणि शेतकरी यांच्यात मागील महिन्यात झालेल्या झालेल्या बैठकीत २० एप्रिल रोजी सर्व शेतकºयांना उसाचे पैसे मिळतील, असे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत लोटल्यानंतरही पैशांची व्यवस्था न झाल्याने पुन्हा शेतकरी, सर्वपक्षीय नेते आणि चेअरमन, संचालक मंडळ यांच्या बैठकीत आठ दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यावेळी ठरले होते की, पतपेढीकडून पैसे उपलब्ध करू, साखर घेऊन जाणाºया इंदूर येथील व्यापाºयांकडून पैसे आणू अन्यथा बुलडाण्यातील अर्बन पतसंस्थेतर्फे पैसे उपलब्ध करू, असे सांगून पुन्हा १५ दिवस लोटले. तरीही चेअरमन अतुल ठाकरे व संचालक मंडळ यांच्याकडून ऊस उत्पादक शेतकºयांना देण्यासाठी पैसा उपलब्ध झाला नाही.
दिला होता उपोषणाचा इशारा
अखेर शेतकरी कृती समितीचे मुख्य प्रवर्तक एस.बी श.पाटील हे ४ मे रोजी आमरण उपोषणाला बसणार होते. मात्र दोन ते तीन दिवसांत पैशांची व्यवस्था करू, असे आश्वासन त्यांना दिल्यानंतर त्यांनी उपोषणाचा निर्णय थांबविला आणि बुधवारी ९ मे रोजी बाजार समितीच्या सभागृहात सर्वपक्षीय नेते अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, चेअरमन ठाकरे, संचालक आणि शेतकºयांच्या बैठकीत पैशांची व्यवस्था होणारच नसल्याचे लक्षात आल्यानंतर एस.बी.पाटील यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर टाकले. त्यानंतर नेत्यांची काही वेळ तारांबळ उडाली.
यावेळी शेतकºयांनी एस.बी.पाटील यांना सावरण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बैठकीत काही वेळाने विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी हेही संतप्त झाले. आम्हास चर्चेसाठी बोलावले होते. एस.बी.पाटील यांनी रॉकेल अंगावर ओतून चुकीचे केले, अशी संतप्त भावना व्यक्त करत अरुणभाई गुजराथीही निघून गेले. त्यानंतर माजी आमदार कैलास पाटील हे शेतकºयांशी बोलताना म्हणाले की, जर चोसाका सुरू झाला नसता तर शेतकºयांना ऊस शेतातच जाळावा लागला असता म्हणून चोसाका सुरू करण्याचा निर्णय त्यावेळी घेण्यात आला.
या गोंधळामुळे बैठक अर्ध्यातच संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील हे बाजार समितीत आले असता इतर नेते निघून गेले होते. त्यामुळे अॅड.पाटील यांनीही एस.बी.पाटील यांच्याकडे घरी जाऊन विचारपूस केली व विषय जाणून घेतला.
अरुणभाई गुजराथी म्हणाले...
अरुणभाई गुजराथी यांनी शेतकºयांशी बोलताना सांगितले की, आपणासमोर केवळ तीन पर्याय आहेत. त्यात प्रथम पर्याय जिल्हा बँकेकडे ‘चोसाका’चे लिंकिंग शेअरचे असलेले एक कोटी ८३ लाख रुपये मिळविण्यासाठी प्रयत्न केला, मात्र कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख
यांनी लिंकिंग शेअरचे पैसे परत करू शकत नाही, असे सांगितले. दुसरा पर्याय साखर किंवा मोलॅसीस विक्रीतून पैसा उपलब्ध करू, मात्र साखरेचे भाव कमी झाल्याने व्यापारी साखर घ्यायला येत नाहीत व मोलॅसीस व्यापारी संप सुरू असल्याने मोलॅसीस घ्यायला येत नाहीत म्हणून तोही पर्याय बंद झाला आहे, तर तिसरा पर्याय ज्या इंदूर येथील व्यापाºयाने चोसाकातील साखर घेऊन गेल्यानंतर एक कोटी ६८ लाख रुपये द्यायला पाहिजे होते ते दिले नाही.
ते मिळविण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे सांगितले. या तीनही पयार्यातून पैसा उपलब्ध होणार नाही असे समजल्यानंतर एस.बी.पाटील यांच्यासह उपस्थित शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना शेतकºयांचे पैसे स्वत: भरावेत असे सांगितले .
शेतकरी काय म्हणाले?
पंडित चिंतामण पाटील (गणपूर) या शेतकºयाचे ‘चोसाका’कडे उसाचे १० लाख रुपये घेणे आहेत. ते म्हणाले की, माझ्या मुलाचे लग्न आहे, मी काय करावे मुलाचे लग्न मी कसे करणार, असा प्रश्न त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांसमोर उपस्थित केला.
तुकाराम हेमा पाटील (पंचक) हे संतप्त होऊन म्हणाले की, आमचे शेतकºयांचे पैसे मिळत नसतील तर तुम्ही नेतेगिरी सोडा.
गुलाब निकम (माचला) हे संताप व्यक्त करीत म्हणाले की, चोसाका पैसे देत नसेल तर सर्वपक्षीय नेत्यांनी आमचे पैसे द्यावेत. कारखाना सुरू होताना नेत्यांनी सांगितले होते की, काट्याखाली पैसे देऊ. म्हणूनच आम्ही चोसाकाला ऊसपुरवठा केला होता. आता मात्र पैसे उपलब्ध होत नसल्याने नेत्यांनीच दुर्लक्ष केले असून या कारखान्याची त्यांनी वाट लावली आहे.