दोनशे रुपये एन्ट्री फी न दिल्याने कंटेनर चालकाचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:44 PM2019-01-17T12:44:49+5:302019-01-17T12:44:57+5:30
जळगाव पोलिसांचा लाचखोरीचा व्हीडीओ व्हायरल
जळगाव : दोनशे रुपये एन्ट्री फी न दिल्याने वाहतूक पोलिसाने सुरत येथील कंटेनर चालकाचे काठीने डोके फोडल्याचा प्रकार उघडकीस आला असून यात चालकाचा डोळा बालंबाल बचावला आहे. कंटेनर चालकाने जळगाव पोलिसांच्या हप्तेखोरीचा केलेला व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे.
हे कंटेनर सुरत येथील ब्रिजमोहन दीपचंद अग्रवाल (रा.सुरत) यांच्या मालकीची आहे. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकारास दुजोरा दिला. तर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मात्र प्रतिसाद दिला नाही.
आधीही जळगाव पोलिसांची बदनामी
गेल्या तीन दिवसापासून जळगाव पोलिसांची बदनामी करणारा कंटेनर चालकाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. याआधी देखील बाहेरील पासींग असलेल्या वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून लाच मागितल्याच्या तक्रारी झालेल्या आहेत. या घटनेत कागदपत्रे पूर्ण असतानाही पोलिसांकडून लाच मागण्यात आली, ती देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी चालकाला काठी मारली. त्यात रक्तबंबाळ झालेल्या चालकाने त्याचा व्हीडीओ तयार केला आहे.चालकाने व्हायरल केलेल्या व्हीडीओत जळगाव वाहतूक पोलीस हाच उल्लेख आहे. त्यामुळे नेमका हा व्हीडीओ कोणत्या ठिकाणी तयार केला. हा प्रकार खरा की खोटा याची चौकशी व्हायला हवी.
हा प्रकार खरा असेल तर जळगाव पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघत असतानाही वरिष्ठ त्याची दखल घेत नाहीत किंवा पोलिसांनाही इज्जतीपेक्षा पैसाच महत्वाचा वाटतो असा अर्थ यातून निघतो. प्रकार खोटा असेल तर पोलिसांची बदनामी करणाऱ्याविरुध्द कारवाई व्हायलाच हवी असाही मतप्रवाह आहे.
पगार वाढवा नाही तर ड्युटी बदल करा
या व्हीडीओमध्ये चालकाने जळगाव पोलिसांना अक्षरश: खालच्या पातळीवर शिव्यांची लाखोली वाहिलेली आहे. पगार अपूर्ण पडत असल्याने पोलीस असले उद्योग करतात.
त्यामुळे सरकारने यांचा पगार वाढवावा नाही तर त्यांची ड्युटी बदल करावी अशी विनंती व वजा सूचना या चालकाने व्हीडीओच्या माध्यमातून दिलेल्या आहे. हा व्हीडीओ फेसबुक व व्हाटसअॅपवर सर्वत्र व्हायरल झालेला आहे. हरियाणातील हिसार येथील एका तरुणाने सोमवारी हा व्हीडीओ फेसबुकवर शेयर केला, त्याला अनेकांनी लाईक केले आहे. यावरून हा व्हिडीओ दिवसभर शहरात चर्चेचा विषय ठरला होता. याप्रश्नी पोलीस प्रशासन काय कारवाई करते? तपास होतो काय? अशा चर्चाही यानिमित्ताने केल्या जात होत्या.
आकाशवाणी चौकातील हा प्रकार आहे. पोलिसांनी चालकाला काठीने मारलेच नाही. तो मद्याच्या नशेत असल्याने खोटे बोलत आहे. चालकाच्या मालकाशी बोलणे झाले आहे. कोणतीही तक्रार नसल्याचे त्यांनी सांगितले. - देविदास कुनगर,पोलीस निरीक्षक वाहतूक
तीन पोलिसांनी पैसे मागितले
कंटेनर मालक ब्रिजमोहन दीपचंद अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता, हा प्रकार सोमवारी जळगाव शहरातच झाल्याचे चालक चांदकुमार याने आपल्याला सांगितले. तीन पोलीस होते, तेथे त्यांनी दोनशे रुपये एन्ट्री शुल्क मागितले, ते देण्यास नकार दिला असता काठीने मारहाण केली. चांदकुमार याने मला झाल्याप्रकाराची माहिती दिली. आपण त्याला वरिष्ठ अधिकाºयांना भेटण्याचा सल्ला दिला होता, मात्र कंटेनरमध्ये लोखंड होते, माल सोडून जाणे शक्य नव्हते. कंटेनर रायपुर येथून लोखंड घेऊन गुजरात जात होता.हा कंटेनर आनंद सील्क मील प्रा.लि.सुरत या नावाने आरटीओकडे नोंद आहे.
काय आहे नेमका व्हीडीओ
ट्रक चालक चांदकुमार (रा.पंजाब) याने पोलिसांचा हप्तेखोरीचा व्हीडीओ तयार केला आहे. या व्हीडीओत त्याने आपबिती कथन केली आहे. चांदकुमार याने नमूद केलेला घटनाक्रम असा.
ट्रक (क्र.जी.जे.१९ एक्स १७४५) हा गुजरातमधील आहे. ट्रक चालकाच्या दाव्यानुसार आकाशवाणी एका सिग्नलजवळ वाहतूक शाखेचे तीन पोलीस थांबलेले आहेत. कंटेनरची नंबर प्लेट नियमात असून वाहनाचा परवाना आहे, कागदपत्रे आहेत असे असतानाही हे पोलीस एन्ट्री शुल्क मागत आहेत. दोनशेची पावती लागले, शंभराची लागेल असे या पोलिसांकडून सांगितले जात आहे. गाडी नियमित चालते. सारे काही नियमात आहे. आजपर्यंत कधी पावती फाडलेली नाही किंवा कधी कुठे पोलिसांनी अडविलेले नाही असे तो सांगत आहे, तरीही अमूक करु, तमूक करु अशी धमकी पोलिसांकडून दिली गेली.
पावती घेण्यास नकार दिला असता एका पोलिसाने डोळ्यावर काठी मारुन फेकली, त्यात डाव्या डोळ्याजवळ दुखापत होऊन रक्तस्त्राव सुरु झाला. या प्रकारानंतर मोबाईलमध्ये व्हीडीओ बनवायला सुरुवात केली असता सर्व पोलीस तेथून पळून गेले. नंतर एकाही सिग्नलवर पोलीस दिसला नाही.एरव्ही एका सिग्नलवर दहा-दहा पोलीस थांबतात, मात्र या प्रकारानंतर सर्व पोलीस पळून गेले. या व्हीडीओमध्ये चांदकुमार याने कंटेनर क्रमांक, घटनास्थळ सारेच चित्रण केले आहे. महामार्गावर रस्त्याचे काम सुरु असल्याचेही दिसत आहे. चिरीमीरीच्या प्रकारामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्हा वाहतूक शाखा बरखास्त केलेली आहे.त्यामुळे हे पोलीस शहर वाहतूक शाखेचेच असल्याचे स्पष्ट होते.