जळगावात सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचा आगार व्यवस्थापकांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:40 PM2019-06-23T12:40:20+5:302019-06-23T12:40:50+5:30
पहाटेपासून रांगेत उभे राहूनही पास मिळत नसल्यामुळे विद्यार्थी संतप्त
जळगाव : सहा दिवसांपासून शाळा सुरु झाल्या तरी विद्यार्थ्यांना एस.टी. बसेस्च्या पास मिळत नसल्याने पास काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पहाटे पाच वाजेपासूनच बसस्थानकात रांगा लागत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊनमुळे स्मार्टकार्डची नोंदणीही होत नसल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी आगार व्यवस्थापकांना घेराव घातला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्मार्टकार्डची नोंदणी न करता, थेट पास देण्याची मागणी केली.
बनावटगिरीला आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे ज्येष्ठ नागरिक व राज्य शासनाच्या विविध पुरस्कारप्राप्त नागरिकांना ‘आधारकार्ड’ क्रमाकांशी जोडलेले स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यासाठी महिनाभरापासून नवीन बस स्थानकात ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्डसाठी नोंदणी सुरु आहे. आता विद्यार्थ्यांनादेखील स्मार्टकार्ड दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर महिन्याला दिला जाणारी कागदी पास बंद होणार आहे.
सर्व्हर डाऊनमुळे विद्यार्थी संतप्त
पास काढण्यासाठी परिसरातील गावातील विद्यार्थी पहाटेपासूनच रांगा लावत असले तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे एका विद्यार्थ्याच्या स्मार्टकार्ड नोंदणीसाठी २० ते २५ मिनिटे लागत आहे. हे स्मार्टकार्ड आधारकार्डच्या क्रमाकांशी लिंक करण्यात येत असल्यामुळे आधारकार्डचे सर्व्हरच अतिशय संथ गतीने सुरु आहे.
विद्यार्थी वेठीस
शाळा सुरु होऊन सहा दिवस झाले तरी विद्यार्थ्यांना पास मिळत नसल्याचे चित्र आहे.बसस्थानकात विद्यार्थ्यांची दररोज गर्दी होत आहे. त्यामुळे आता तर नोंदणीसाठी पहाटेपासूनच रांगा लागत आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना दररोज भुर्दंड सहन करावा लागत असून ते वेठीस धरले जात आहे. तसेच या ठिकाणी स्मार्टकार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनींही गर्दी केल्यामुळे नोंदणी कक्षाजवळ अक्षरश: झुंबड उडत आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
विद्यार्थ्यांना पासेससाठी होणाऱ्या विलंबाबत डॉ.राधेश्याम चौधरी यांनी बस स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांना तात्काळ पास मिळण्यासाठी दोन ठिकाणी स्मार्टकार्ड नोंदणीं व विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे जनरेटरची व्यवस्था करावी, सर्व्हर डाऊनच्या तांत्रिक अडचणी तात्काळ सोडाव्यात, विद्यार्थ्यांना लवकर पास मिळण्यासाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, कॅन्टींनच्या इमारतीत विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या आगार प्रमुखांकडे केल्या. विद्यार्थ्यांच्या या समस्या न सुटल्यास काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही चौधरी यांनी यावेळी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर कोळी, संदीप तेले, पी. पी. पाटील, सुभाष ठाकरे, कैलास पाटील आदी उपस्थित होते.