संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

By अमित महाबळ | Published: September 20, 2022 06:38 PM2022-09-20T18:38:17+5:302022-09-20T18:39:12+5:30

जळगाव जिल्ह्यात संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. 

Due to mixed environment in Jalgaon district, patients of cold, cough and fever have increased  | संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

संमिश्र वातावरणाचा फटका; सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले

Next

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कधी ऊन, तर कधी पाऊस अशा संमिश्र वातावरणाचा फटका लहान मुले व वयोवृद्धांना बसत आहे. शहरात सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण वाढले आहेत. पाच वर्षांखालील मुलांमध्ये ही लक्षणे अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. संधीवात व अस्थमा असलेल्या रुग्णांनाही ढगाळ वातावरणाचा त्रास होतो.

गेल्या आठवड्यात कधी अंगातून घामाच्या धारा वाहायच्या, तर कधी ढगाळ वातावरण होते. सोमवारपासून पावसाने अधिकच जोर धरला आहे. या संमिश्र वातावरणाचा परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी होत आहे. वातावरणात वारंवार होत असलेले बदल वयोवृद्ध व लहान मुलांना सहन होत नाहीत. त्यामुळे हा वयोगट लवकर आजाराला बळी पडतो. अशा वातावरणात लहान मुलांचे आरोग्य अधिक जपायला हवे. त्यांना थंड पदार्थ खायला देऊ नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. पुढील चार दिवस संमिश्र वातावरण राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

लसीकरणामुळे मोठ्यांमध्ये संसर्ग कमी
वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने विषाणूजन्य आजारांचे रुग्ण वाढत आहेत. न्यूमोनियासदृश्य आजार, व्हायरल फिव्हरचे रुग्ण अधिक संख्येने आहेत. रुग्णांमध्ये पाच वर्षांच्या आतील मुलांची संख्या अधिक आहे. चांगली प्रतिकारशक्ती व कोविड प्रतिबंधक लसीकरण यामुळे मोठ्या व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण कमी आहे, अशी माहिती डॉ. मिलिंद बारी यांनी दिली.

संधीवात, अस्थमाचा वाढतो त्रास
संधीवात व अस्थमाच्या रुग्णांना ढगाळ वातावरणाचा त्रास होतो. अस्थमाच्या रुग्णांमध्ये दम लागण्याचे प्रमाण वाढते. ढगाळ वातावरणात विषाणू जोमाने वाढतात. आता भाद्रपद महिना सुरू आहे. त्यामुळे ऊन हवे होते. या दिवसांत धान्य वाळवले जाते. पण पाऊस पडतो आहे. ऋतू विपरीत लक्षणे असल्यास शरीराला नैसर्गिक वातावरणाशी जुळवून घेण्यात अडचण येते. जुना मधुमेह, रक्तदाब यासारखा आजार असलेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. संमिश्र वातावरणामुळे ती अजून कमी होते, अशी माहिती डॉ. अनुपम दंडगव्हाळ यांनी दिली. तालुक्यातील ग्रामीण भागात सर्दी, खोकला, तापाची लक्षणे लहान मुले व मोठ्या व्यक्तींमध्येही दिसून येत आहेत, अशी माहिती डॉ. विकास जोशी यांनी दिली.


 

Web Title: Due to mixed environment in Jalgaon district, patients of cold, cough and fever have increased 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.