‘एमपीडीए’मुळे गुन्हेगारांना यंदाचे वर्ष ठरले धोक्याचं!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 07:13 PM2023-12-27T19:13:13+5:302023-12-27T19:15:04+5:30

‘अब तक बावन्न’ : पोलीस विभागाने मुसक्या आवळल्या.

Due to MPDA this year has become dangerous for criminals | ‘एमपीडीए’मुळे गुन्हेगारांना यंदाचे वर्ष ठरले धोक्याचं!

‘एमपीडीए’मुळे गुन्हेगारांना यंदाचे वर्ष ठरले धोक्याचं!

कुंदन पाटील, जळगाव : जिल्हाभर फोफावलेले धोकादायक गुन्हेगार, वाळू तस्कर व‌ हातभट्टी गुंडांच्या पोलीस विभागाने चांगल्याच मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. गुन्हे दाखल या ५२ गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ गुन्हे दाखल आहेत. 
जिल्हा पोलिसांनी प्रतिबंधक कारवाईवर जोर वाढविला असून, जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान तब्बल ५२ जणांवर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयात एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव दिला जातो. जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम मान्यता दिल्यानंतर सदर गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत असते. जिल्ह्यात एमपीडीए दाखल गुन्हेगारांना नाशिक, औरंगाबाद, येरवडा, ठाणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर व  मुंबई येथील मध्यवर्ती कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्यात आलेले आहे. मुसक्या आवळण्यात आलेल्या गुन्हेगारांत सर्वाधिक वाळू तस्कर व हातभट्टीवाल्यांचा समावेश आहे. 

५२ जणांवर ५१३ गंभीर गुन्हे

एमपीडीए कारवाईतील ५२ जणांवर गंभीर स्वरूपाचे ५१३ दाखल आहेत‌. त्यात खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, जातीय दंगली व विनयभंगासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या ३७ धोकादायक गुन्हेगारांवर ३७१ गुन्हे दाखल आहेत. वाळूची अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ४ जणांवर २९ गुन्हे दाखल आहेत. हातभट्टी व्यवसाय करणाऱ्या ११ जणांवर ११४ गुन्हे दाखल आहेत. 

काय आहे एमपीडीए कायदा ?

महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणार्‍या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यास आळा घालण्याबाबत अधिनियम १९८१ म्हणजेच एमपीडीए (महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अ‍ॅक्टिविटी). सराईत गुन्हेगार किंवा सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था भंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तींविरुद्ध एमपीडीएची कारवाई करता येते. या कायद्यानुसार सराईत गुन्हेगाराला एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येते. कारवाईनंतर गुन्हेगाराला पोलीस आयुक्त, उच्च न्यायालय किंवा अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे अपील करता येते.

वर्षभरातील महिनावार कारवाई

जानेवारी- अमळनेर २, भुसावळ व‌ चाळीसगाव मधील प्रत्येकी १
फेब्रुवारी- जळगाव
मार्च -जळगाव २ , अमळनेर व भुसावळ प्रत्येकी एक
एप्रिल- चाळीसगाव, रावेर, जळगाव मधील प्रत्येकी एक
मे-चोपडा, जळगाव व अमळनेर मधील प्रत्येकी एक
जून- जळगाव ३, भुसावळ व यावल मधील प्रत्येकी एक
जुलै- भुसावळ ३, अमळनेर, चाळीसगाव व जळगाव मधील प्रत्येक एक 
ऑगस्ट- जळगाव ३, भुसावळ २, अमळनेर व चोपडा मधील प्रत्येक एक 
सप्टेंबर- जळगाव ६ 
ऑक्टोंबर- जळगाव २, भुसावळ, चाळीसगाव व अमळनेरमधील प्रत्येक एक
नोव्हेंबर- एरंडोल १
डिसेंबर-भडगाव, यावल, जळगाव व एरंडोलमधील प्रत्येकी एक.

Web Title: Due to MPDA this year has become dangerous for criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव