जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे २५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:41 AM2019-04-19T11:41:39+5:302019-04-19T11:42:44+5:30
केळीला सर्वाधिक तडाखा
जळगाव : जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये सर्वाधिक २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २५०.६५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे.
गेल्या रविवारी अवकाळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिल्याने पावसासह वादळी वाऱ्यामुळे शेतातील ज्वारी, मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, केळी, लिंबू यासह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात १४ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे ७५ गावातील ४९३ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जिल्ह्यात बाधीत सुमारे २५०.६५ हेक्टरवर शेतशिवारांचा महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाला हा अहवाल आज प्राप्त झाला असून शेतकºयांना वादळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
केळी सर्वाधिक फटका
जिल्ह्याभरात झालेल्या वादळीपावसामुळे सर्वाधिक फटका केळी ला बसला असून जिल्हाभरातील ७३ गावांमधील २०८ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे. यात चोपडा तालुक्यात सर्वाधिक ६३ गावांमधील १६१.४५ हेक्टरवरील केळी बाधीत झाली आहे. त्या खालोखाल जळगाव तालुक्यात ४६ हेक्टर तर यावल तालुक्यात ०.५० हेक्टरवरील केळीला फटका बसला आहे.
मक्याचेही नुकसान
वादळी पावसामुळे जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र निवडणूक कामामुळे पंचनामा मागे पडले होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तदेखील प्रकाशित केले होते. त्यानंतर पंचनामे सुरू झाले व तसा अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास प्राप्त झाला. यात केळी खालोखाल २२.७ हेक्टरवरील मक्याचेही नुकसान झाले आहे. यात अधिक प्रमाण जळगाव तालुक्यात असून ८ गावातील ८५ शेतकºयांच्या १५ हेक्टरवरील मक्याला फटका बसला.
या सोबतच चोपडा तालुक्यात १३ हेक्टरवरील लिंबू, याच तालुक्यात ३ हेक्टरवरील बाजरीला तसेच चोपड्यासह जामनेर तालुक्यात एकूण चार हेक्टरवरील फळपिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला.