‘अवकाळी’ मुळे कोथिंबीर वधारला, किराणा साहित्याचेही दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 07:48 PM2021-01-10T19:48:56+5:302021-01-10T19:48:56+5:30
स्थिर असलेल्या भाजीपाल्यात वाढ
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. भाजीपाल्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लिंबू, कांदे यांचे भाव वाढले आहे तर टमाटे, भरीताचे वांगे चांगलेच स्वस्त झाले आहे. किराणा साहित्यात शेंगदाणे, तूप, मठ डाळ यांचे भाव वधारले आहे तर साखर स्वस्त झाली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढू लागले होते. ते अद्यापही कायम आहे.
किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात अनेक वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. रवा ३५ ते ४० रुपये, मैदा ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या तुपाचेही भाव या आठवड्यात वाढून ते ११० रुपयांवरून १२० ते १२५ रुपयांवर पोहचले आहे.
बटाटे स्वस्त, कांदे वधारले
गेल्या अनेक दिवसांपासून बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ३० रुपयांवर आले होते. आता ते २५ रुपयांवर आले आहे. मात्र कांद्याचे भाव ३० रुपयांवरून ५० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.
गाजरचे भाव पुन्हा वधारले
गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३० ते ३५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.
साखरेचा गोडवा
गेल्या काही दिवसांपासून साखर ३८ रुपये प्रति किलोवर स्थिर होते. मात्र आता हे भाव ३६ रुपये प्रति किलोवर आले आहेत. तसे पाहता दिवाळीच्या काळात साखरेला मागणी वाढते व भावही वधारतात. मात्र यंदा हे भाव ३८ रुपयांवर कायम होते. आता ते कमी झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला व किराणा साहित्याचे भाव वाढत आहे. कांदा स्वस्त झाल्याने दिलासा होता. मात्र आता तो पुन्हा वधारल्याने व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने बोझा वाढत आहे.
- संजय कोळी, ग्राहक
गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. या आठवड्यात मात्र साखर व साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत.
- सचिन छाजेड, व्यापारी
अवकाळी पावसामुळे कोथिंबीरच्या आवकवर परिणाम झाल्याने त्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. सोबतच कांद्याचेही भाव वधारले आहेत. टमाटे मात्र स्वस्त झाले आहे.
- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते