पाणी अडविल्यामुळे दोन गावात तणाव,गुन्हा दाखल करण्याच्या आदेशानंतर मिटला वाद
By admin | Published: April 8, 2017 10:01 PM2017-04-08T22:01:31+5:302017-04-08T22:01:31+5:30
पांझरा नदीत सोडण्यात आलेले आवर्तन थेट नीम सीमेवरील भिलाणे बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तांदळी ग्रामस्थांनी मध्येच पाट्या टाकून पाणी अडविले.
ऑनलाइन लोकमत
अमळनेर (जि. जळगाव), दि. 8 - पांझरा नदीत सोडण्यात आलेले आवर्तन थेट नीम सीमेवरील भिलाणे बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्याऐवजी तांदळी ग्रामस्थांनी मध्येच पाट्या टाकून पाणी अडविले. त्यामुळे संतप्त नीम ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे दोन गावांमध्ये शनिवारी सकाळी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला.
पांझरा नदीचे पाणी तांदळी गावाच्या बंधाऱ्यापर्यंत पोहोचले. तेव्हा नीम ग्रामस्थांनी हे पाणी नीम व भिलाणे गावापर्यंत पोहचू देण्याची विनंती केली होती. रात्रीतून पाणी नीम बंधाऱ्यापर्यंत न आल्याने नीमचे ग्रामस्थ सकाळी तांदळी बंधाऱ्यावर पोहोचले. त्यावेळी बंधाऱ्यात पाट्या टाकून पाणी रोखण्यात आल्याचे आढळले. आमचा बंधारा भरल्याशिवाय पाट्या काढणार नाही, अशी भूमिका तांदळी ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे नीम व तांदळी येथील ग्रामस्थ बंधाऱ्याजवळ जमले. त्यामुळे तणावसदृश स्थिती उद्भवली होती.
शिरपूर प्रांताधिकारी यांनी पाणी अडविणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर मात्र तांदळी ग्रामस्थांनी नरमाईची भूमिका घेत बंधाऱ्यात अडकविलेल्या पाट्या काढून पाणी सोडले.त्यामुळे संघर्ष टळला.