जलसंकटामुळे जळगावातील १०८ गावांमधील हागणदारीमुक्ती धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 02:36 PM2018-05-16T14:36:17+5:302018-05-16T14:36:17+5:30

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने शौचालयांचा वापर झाला बंद

Due to water scarcity open defecation problem started in Jalgaons 108 villages | जलसंकटामुळे जळगावातील १०८ गावांमधील हागणदारीमुक्ती धोक्यात

जलसंकटामुळे जळगावातील १०८ गावांमधील हागणदारीमुक्ती धोक्यात

Next

जळगाव : सरासरीपेक्षा कमी झालेले पर्जन्यमान आणि मे महिन्यात वेगाने कमी होत असलेली भूजलपातळी यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १०८ गावांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत असल्याने ग्रामीण भागात शौचालयांचा वापर बंद झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले होते. त्यामुळे जानेवारी महिन्यापासून अनेक गावांमध्ये दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिला, लहान मुलांसह नागरिकांकडून पायपीट केली जात आहे.

१०८ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा
सद्यस्थितीला जळगाव जिल्ह्यातील १०८ गावांमधील जलस्त्रोत कमी झाल्याने या ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अमळनेर तालुक्यातील ४४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई आहे. त्यापाठोपाठ जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील २६ गावांमध्ये तर पारोळा तालुक्यातील १९ गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. या गावांमध्ये पिण्यासाठी पाणी नाही, तर शौचालयाच्या वापरासाठी पाणी कोठून आणावे, असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांनी शौचालयांचा वापर बंद केला आहे.

कपडे धुण्याचे पाणी शौचालयासाठी
पाणी टंचाईच्या काळात देखील शौचालयाचा वापर करण्यावर काही कुटुंबांनी पर्याय शोधला आहे. अंघोळ आणि कपडे धुण्याचे पाणी एका टाकीत साठवून ठेवत त्याचा शौचालयासाठी वापर ग्रामीण भागात करण्यात येत आहे. कुटुंबातील वृद्ध तसेच महिलांकडूनच या काळात शौचालयाचा वापर करण्यात येत आहे. तर अन्य सदस्य पाण्याअभावी नाईलाजास्तव उघड्यावर प्रात:विधीसाठी जात आहेत.

विहिरीच्या जलस्त्रोतासाठी नालाबांध
पाण्याअभावी वैयक्तिक शौचालयांचा वापर थांबल्याने काही गावांमध्ये ग्रामपंचायतीतर्फे सुरु करण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढला आहे. नाल्याच्या शेजारी असलेल्या विहिरीचा जलस्त्रोत पुर्नजिवित व्हावा यासाठी नाल्याचे सांडपाणी अनेक ठिकाणी अडवण्यासाठी नालाबांध करण्यात येत आहे.

पिण्यासाठीच नाही तर शौचालयासाठी पाणी कुठून आणणार?
अमळनेर, जामनेर व पारोळा तालुक्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती आहे. या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये ग्लासभर पिण्यासाठी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पिण्यासाठीच नाही तर शौचालयासाठी पाणी कोठून आणणार असा प्रश्न या गावातील महिलांसह नागरिकांपुढे आहे.

१८१ गावांमध्ये पाणीबाणी
जळगाव जिल्ह्यातील १८१ गावांमध्ये पाणी टंचाई सदृष्यस्थिती आहे. त्यामुळे या गावांमधील शेतातील तसेच परिसरातील विहिरींचे अधिग्रहण जिल्हा प्रशासनाने केले आहे. या गावांमध्ये १० ते १५ दिवसांआड पाणी पुरवठा होत आहे. भांड्यांमध्ये पिण्याचे पाणी साठवण्याचा प्रयत्न होत असल्याने डेंग्यू तसेच मलेरियाच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे.

सार्वजनिक शौचालयांचा वापर वाढला
ग्रामपंचायतींमार्फत सार्वजनिक शौचालयासाठी अखंडित पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याअभावी वैयक्तिक शौचालय बंद करत अनेकांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील भीषण पाणी टंचाई असलेली गावे- 
जळगाव- २०६
जामनेर- २६३७
धरणगाव- १७
एरंडोल- १०७
भुसावळ- २०९
मुक्ताईनगर- १२४
बोदवड- ११०
पाचोरा- ३१३
चाळीसगाव- ९०३
अमळनेर- ४४४०
पारोळा- १९११
 

Web Title: Due to water scarcity open defecation problem started in Jalgaons 108 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव