लग्नसराईमुळे वांगे वधारले, किराणा साहित्याचेही दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:09 AM2020-12-28T04:09:38+5:302020-12-28T04:09:38+5:30
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी ...
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊ लागली आहे. यात लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मोठी मागणी वाढल्याने त्याचे भाव थेट दुप्पट झाले आहेत. गेल्या आठवड्यापर्यंत २० रुपये प्रति किलोवर असलेले वांगे ४० रुपयांवर पोहोचले आहे. यासोबतच टमाटे, कोथिंबीरही चांगलेच वधारले आहे.
गेल्या दीड महिन्यापासून किराणा साहित्यासह भाजीपाल्याचे दर जवळपास स्थिरच होते. यात गेल्या आठवड्यात केवळ चंपाषष्टीमुळे भरीताच्या वांग्यांना मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढले होते.
या आठवड्यात मात्र कांदे, बटाटे वगळता इतर भाजीपाल्याचे भाव चांगलेच वाढले आहेत. किराणा भावाचा विचार केला तर या आठवड्यात बहुतांश वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेंगदाण्याचे भाव ११५ ते १२० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. अशाच प्रकारे बेसणपीठदेखील वधारले असून ते ८५ ते ९० रुपये प्रति किलो झाले आहे. साखर ३८ रुपये, रवा ३० ते ३२ रुपये, मैदा २६ ते २८ रुपये प्रति किलोवर आहे.
कांदा-बटाट्याचे भाव कमी
गेल्या अनेक दिवसांपासून कांदे-बटाट्याचे भाव चांगलेच वाढले होते. मात्र आता दोन आठवड्यांपासून नवीन बटाट्याची आवक सुरू झाल्याने बटाटे गेल्या आठवड्यात ४० रुपयांवर आले होते. आता ते ३० ते ३५ रुपयांवर आले आहेत. तसेच कांदेदेखील ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत.
गाजरचे भाव वधारले
गाजरचे भाव पुन्हा वाढले आहे. गेल्या आठवड्यात २५ ते ३० रुपये प्रति किलोवर असलेल्या गाजरचे भाव ३५ ते ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
कोथिंबीर महागली
गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीरचे भाव चांगलेच कमी झाले होते. आता ते पुन्हा वाढू लागले आहेत. गेल्या आठवड्यात २० रुपये प्रति किलो असलेल्या कोथिंबीरचे भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. टमाट्याचेदेखील भाव ४० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.
लग्नसराईत भाजीसाठी वांग्यांना जास्त पसंती असते. त्यामुळे वांग्याचे व इतरही भाज्यांचे भाव वाढल्याने तसेच किराणा साहित्याचेही भाव वाढल्याने बोजा वाढत आहे.
- संजय सपकाळे, ग्राहक
गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या किराणा साहित्याचे भाव सध्या हळूहळू वाढू लागले आहेत. सध्या मागणी वाढत असल्याने भावदेखील वाढत आहे.
- प्रवीण पगारिया, व्यापारी
लग्नसराईमुळे काटेरी वांग्यांना मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढत आहेत. यासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून स्थिर असलेल्या इतरही भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत.
- सूर्यकांत चौधरी, भाजीपाला विक्रेते