‘एस.टी’ला लग्नसराईने लावली उत्पन्नाची हळद; दहा दिवसात २५ लाख प्रवाशांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 01:24 PM2023-05-13T13:24:32+5:302023-05-13T13:33:19+5:30
महामंडळाच्या तिजोरीत दररोज पडताय एक कोटी
जळगाव : यंदाची लग्नसराई एस.टी.महामंडळाच्या पथ्यावर पडली आहे. उन्हाळी सुट्यांनीही एस.टी.च्या उत्पन्नाला गारवा घातला असून दररोज अडिच लाखांवर प्रवासी एस.टी.ने प्रवास करीत आहेत. त्यामुळे दि.१ ते १० मेदरम्यान जळगाव विभागाला ९ कोटी ७७ लाख ९४ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
एस.टी.मंडळाच्या जळगाव विभागात नव्याने दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांसाठी असणारी सेवा बंद करुन बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे दररोज अडिच लाखांवर प्रवाशांचा प्रवास सुरु आहे.
एकही अपघात नाही
लग्नसराई आणि उन्हाळी सुटीच्या कालावधीत जळगाव विभागातील एकही बसचा अपघात झालेला नाही. ६६ बसेस सेवा देताना रस्त्यात बंद पडल्या आहेत. त्यावेळी अन्य बस उपलब्ध करुन प्रवाशांची उचल करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’
दरम्यान, गर्दीचा हंगाम असल्याने कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना ‘ब्रेक’ दिला गेला आहे. आवश्यकतेनुसार कमीत कमी सुट्या देऊन सेवा सुरु ठेवण्यात आली आहे. विभागात ७४० बसगाड्या आहेत. त्यातील ११० नव्या बसेस लांब पल्ल्याची सेवेसाठी धावत आहेत.
विभागाचे दैनंदिन उत्पन्न व आकडेवारी लाखात
दि.- उत्पन्न - प्रवासी
१ मे- ९३.१४- २.५०
२- ९९.५८-२.६३
३-९८.६४-२.७१
४-९८.९५-२.७२
५-९३.६१-२.५३
६-९२.१८-२.४४
७-९६.४३-२.४३
८-१०२.१७-२.६५
९-१००.१२-२.६३
१०-१०३.११-२.५३
एकूण-९७७.९४-२५.७६
उत्पन्नाच्या तुलनेत जळगाव विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. सहकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून जळगावची एस.टी. प्रवाशांना सुखकर सेवा पुरवित आहे. -भगवान जगनोर, विभाग प्रमुख.