चुकीच्या उपचारामुळे मांडवे बुद्रुक येथील बालकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 04:48 PM2017-09-18T16:48:55+5:302017-09-18T17:27:56+5:30
उपचाराबाबत विचारणा केल्यानंतर कुटुंबिय व डॉक्टरांमध्ये वाद
ऑनलाईन लोकमत
जामनेर, दि.18 - मांडवे बुद्रुक ता.जामनेर येथील इमरान नब्बास तडवी (वय 6) या बालकाचे सोमवारी पहाटे दुर्दैवी निधन झाले. या बालकावर तोंडापूर येथील डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
मांडवे बुद्रुक येथील इमरान तडवी या बालकाला शुक्रवारी ताप आल्याने कुटुंबियांनी त्याला तोंडापूर येथील खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी आणले. डॉक्टरांनी उपचार करून गोळ्या दिल्या. त्यानंतरही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला रविवारी पुन्हा तोंडापूर येथे डॉक्टरांकडे आणले. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. या बालकाला घरी आणल्यानंतर ज्या ठिकाणी इंजेक्शन दिले त्या ठिकाणची त्वचा काळसर पडली.
रविवारी रात्री या बालकाची प्रकृती गंभीर झाल्याने पुन्हा डॉक्टरांकडे आणले. इंजेक्शनबाबत डॉक्टरांना विचारणा केल्यानंतर वडील नब्बास तडवी व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जाधव, पोलीस पाटील सागर पाटील यांच्यासोबत डॉक्टरांचा वाद झाला. त्यानंतर पालकांनी मुलाला वाकडी प्राथमिक केंद्रात आणले. येथील डॉक्टरांनी त्याला जामनेरला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र रस्त्यातच या बालकाचा मृत्यू झाला. जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉ.विनय सोनवणे यांनी या बालकाला मृत घोषित केले.
या बालकाचे जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शुक्रवारी मुलाला ताप आलयने तोंडापूर येथे खाजगी रुग्णालयात आणले होते. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने शनिवारी डॉक्टरांनी पुन्हा इंजेक्शन दिले. त्यामुळे मुलाच्या शरीरावर चट्टे दिसून आले. या दरम्यान प्रकृती गंभीर झाल्याने मृत्यू झाला. डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आहे.
- नब्बास तडवी, मयत मुलाचे वडिल, मांडवे बुद्रुक.