स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावरील खोदलेल्या चाऱ्या ठरताहेत डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:16+5:302021-02-18T04:28:16+5:30

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर ...

The dug fodder on the road between Swatantrya Chowk and Neri Naka is a headache | स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावरील खोदलेल्या चाऱ्या ठरताहेत डोकेदुखी

स्वातंत्र्य चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावरील खोदलेल्या चाऱ्या ठरताहेत डोकेदुखी

Next

१५ दिवसांपासून दुरुस्तीच नाही : वाहनधारकांना अडथळा, निष्काळजीपणा लपविण्यासाठी लावले बॅरिकेड‌्स

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील प्रत्येक रस्त्यावर अमृत अंतर्गत खोदकाम झाल्याने रस्त्यांची स्थिती कशी आहे, हे आता जळगावकांना सांगण्याची गरज नाही. मात्र, खोदकाम झालेले रस्ते तरी किरकोळ पद्धतीने वाहनधारकांना वाहने चालविण्याइतपत योग्य करावेत इतकीही तत्परता मनपा प्रशासन किंवा मनपातील सत्ताधारी करताना दिसून येत नाही. स्वातंत्र्य चौक, पांडे चौक ते नेरी नाक्यादरम्यानच्या रस्त्यावर अमृत अंतर्गत भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले. खोदलेल्या चाऱ्या व्यवस्थित बुजविल्या गेल्या नसल्याने या चाऱ्या वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात मनपाकडून अनेक दिवस खोदलेले रस्ते दुरुस्त केले जात नसल्याने या अडचणीत भर पडत आहे. स्वातंत्र्य चौक ते नेरी नाका दरम्यानच्या रस्ता महिनाभरापूर्वी खोदण्यात आला होता. विशेष म्हणजे अमृत अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन रस्त्याच्या मधोमध टाकण्यात आली आहे. यामुळे करण्यात आलेले खोदकाम रस्त्याचा मध्यभागी आहे. त्यातच मातीनेच चाऱ्या बुजविल्या गेल्यानंतर, या चाऱ्या डांबराव्दारे बुजविल्या गेल्या पाहिजे होत्या. मात्र, पंधरा दिवसांपासून या चाऱ्या बुजविल्या गेलेल्या नाहीत. मनपाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

चाऱ्या झाल्या दुभाजक

रस्त्याचा मध्यभागी या चाऱ्यांचे खोदकाम झाले असून, आता या चाऱ्याच दुभाजकांचे काम करत आहेत. त्यात वाहतूक शाखेने नेरी नाक्याजवळ चाऱ्यांच्या ठिकाणावरच बॅरिकेड‌्स लावले आहेत. त्यामुळे अनेकदा हे बॅरिकेड‌्सच वाहनधारकांना अडथळा ठरत आहेत. विशेष म्हणजे हे बॅरिकेड‌्स मनपाची निष्क्रियता लपविण्यासाठीच उभे केले असल्याचे वाटते. पंधरा दिवसांपासून या रस्त्याची दुरुस्ती नाही. या चाऱ्यांमधून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

धूळ आणि अतिक्रमणाने वाढला त्रास

रस्त्याचे काम झालेले नाही, त्यातच चाऱ्या खोदल्यामुळे वाहनधारकांना त्रास होत असतानाच, नेरी नाका ते पांडे चौक दरम्यान अनेक वाहने थेट रस्त्यालगत उभी केली जातात. अनेकांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे या त्रासात जास्तच वाढ होते. खोदलेल्या चाऱ्या या डांबर, खडीने बुजविल्या गेल्या नसल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात धूळदेखील उडत असते, यामुळे या रस्त्यावरून वाहने घेऊन जायलादेखील आता वाहनधारकांना विचार करावा लागत आहे. प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: The dug fodder on the road between Swatantrya Chowk and Neri Naka is a headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.