डमी- काही परीक्षार्थ्यांमध्ये नाराजी तर काहींनी केले ‘कमाल संधी’ निर्णयाचे स्वागत..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:14 AM2021-01-02T04:14:09+5:302021-01-02T04:14:09+5:30
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कमाल संधी मर्यादा घालून देण्यात आला ...
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कमाल संधी मर्यादा घालून देण्यात आला आहे. या निर्णयाचा काही परीक्षार्थ्यांनी स्वागत केले आहे तर काहींनी या निर्णयामुळे गाेंधळ वाढल्याची प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तर या निर्णयाबाबत नाराजी देखील व्यक्त केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थ्यांना जास्तीत जास्त ६ वेळा, तर इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ९ व अनुसूचित जाती-जमाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांना कमाल संधीची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील उमेदवारांकडून त्यावर प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या. या निर्णयाचे स्वागत करीत, कमी संधी मिळणार असल्यामुळे इतर परीक्षांकडेही परीक्षार्थी वळतील आणि प्लॅन ‘बी’ जवळ ठेवतील, असे काही परीक्षार्थ्यांनी सांगितले. कमी संधी मिळणार असल्यामुळे काहींनी नाराजी देखील व्यक्त केली.
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा परीक्षार्थी पूर्वपरीक्षेच्या कोणत्याही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर परीक्षार्थी कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
आयोगाने घेतलेला निर्णय योग्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेला निर्णय काहीअंशी योग्यही आहे, यामुळे वर्षानुवर्षे परीक्षा देणारे विद्यार्थी हे इतर पर्यायी मार्ग स्वीकारतील. वर्षानुवर्षे तयारी करत असल्याने येणारे नैराश्य यातून होणाऱ्या आत्महत्या कमी होतील.
-वरदानसिंग चव्हाण, परीक्षार्थी
प्लॅन ‘बी’वर लक्ष केंद्रित करतील...
विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात. काहींना यश प्राप्त होते तर काहींना नाही. पुढील भविष्याचा विचार करून त्यादृष्टीने प्लॅन करतील. विद्यार्थी योग्यवेळी निर्णय घेऊन त्यातून बाहेर पडतील आणि प्लॅन ‘बी’वर लक्ष केंद्रित करतील, तारुण्याच्या वयात योग्यवेळी काहीतरी करतील.
- गोपाल तायडे, परीक्षार्थी
परीक्षार्थ्यांचा स्वप्नभंग होईल
खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी सहा तर उर्वरित मागासवर्गीयांसाठी नऊ संधी व अनुसूचित जाती-जमातीच्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी संधीची मर्यादा असणार नाही. हा एकप्रकारे आरक्षणाचा गैरउपयोग होताना दिसत आहे. इतर प्रवर्गातील परीक्षार्थ्यांसाठी शासकीय नोकरी करण्याचा स्वप्नभंग होईल.
- राहुल माळी, परीक्षार्थी
लवकर यश संपादन होईल
मी, या निर्णयाचा स्वागत करीत आहे. कारण, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आता संधीची कमाल मर्यादा लक्षात घेऊन भविष्यातील एक योग्य अधिकारी दृष्टिकोनातून अभ्यासाला लागेल. तो समाजातील योग्य पैलूंचा अभ्यास करेल आणि यात विद्यार्थी लवकर यश संपादन करतील, असे मला वाटतंय.
- भावेश सोनवणे, परीक्षार्थी