चाळीसगाव येथे डंपरच्या धडकेत जि.प. शाळेचे केंद्रप्रमुख ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:53 AM2019-12-28T11:53:35+5:302019-12-28T11:54:05+5:30
शाळेत जात असताना झाला अपघात
चाळीसगाव, जि. जळगाव : शाळेतील कवायत निरीक्षणासाठी निघालेले जि.प.मेहुणबारे बिटचे केंद्रप्रमुख लखीचंद एकनाथ कुमावत (वय ५५) हे भरधाव येणा-या डंपरच्या धडकेत जागीच ठार झाले. ही घटना धुळे - सोलापूर महामार्गावर शनिवारी सकाळी सात वाजता चाळीसगाव शहरानजीक घडली.
लखीचंद कुमावत हे येथूनच जवळ असणा-या करगाव आश्रमशाळेत कवायत निरीक्षणासाठी निघाले होते. श्रीराम नगर येथे त्यांचे घर असून रस्त्याच्या बाजूला ते दुचाकीवर त्यांना घेण्यासाठी येणा-या शिक्षकाची वाट पहात उभे होते. याचवेळी धुळे कडून भरधाव वेगाने येणा-या खडीने भरलेल्या डंपरने (क्र. एम.एच.१९सीवाय ६६११) त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत त्यांच्या मानेवरुन चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. चेह-याचा पूर्ण चेंदामेंदा झाल्याने बोटातील अंगठी व कपड्यांवरुन त्यांची ओळख पटली.
डंपर चालक यशवंत उर्फ पिंटू विष्णू पाटील (वय ४०, रा. जुने गाव मेहुणबारे) याला घटनास्थळावरुन पळून जात असताना ताब्यात घेतले.
अतिशय बोलके व मनमिळावू केंद्रप्रमुख म्हणून मयत कुमावत हे शिक्षक आणि शिक्षण विभागात परिचित होते. अपघाताचे वृत्त समजाताच त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी मन हेलावून टाकणारा आक्रोश केला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगी असा परिवार आहे.
अजितकुमार पाटील यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. डंपर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.