जळगाव येथे महामार्गावर गॅस भरलेल्या टॅँकरवर आदळला भरधाव डंपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:12 PM2017-11-02T16:12:11+5:302017-11-02T16:16:09+5:30
भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती’ अशीच होती.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२ : भरधाव वेगात येत असलेला डंपर समोरुन वळण घेत असलेल्या गॅस टॅँकरवर आदळल्याची घटना गुरुवारी पहाटे पाच वाजता अजिंठा चौकात घडली. डंपर हा गॅस जोडणी पाईपवरच आदळला. सुदैवाने पाईप फुटला नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांच्या चालकांसाठी तर ही घटना म्हणजे ‘काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती’ अशीच होती.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गॅस भरलेला टॅँकर (क्रमांक एन.एल.०१ ए.ए.२६४४) गुरुवारी पहाटे पाच वाजता इच्छादेवी चौकाकडून एमआयडीसीतील गोदामात जात असताना अजिंठा चौकात वळण घेतांना बाजार समितीकडून भरधाव वेगाने आलेला डंपर (क्र. एम.एच. १२ ई.एफ.९९५४) टॅँकरवर आदळला. गॅस पाईपची जोळणी असलेल्या ठिकाणीच डंपर धडकला. त्यात डंपरच्या दर्शनी दर्शनी भागाचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने गॅस गळती झाली नाही, अन्यथा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती.
या अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, अतुल पाटील व अरुण राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर टॅँकर सुरक्षितस्थळी हलविण्यात आला. या अपघातात डंपर चालक किरकोळ जखमी झालेला आहे.