जळगावात सप्तसुरांनी उजळली दिवाळी पहाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:01 PM2018-11-06T23:01:35+5:302018-11-06T23:01:45+5:30
हजारो दिव्यांच्या साक्षीने स्वरचैतन्याचा उत्सव
जळगाव : मिणमिणत्या पणत्या प्रज्ज्वालीत करता करता पहाटेच उजेडाची अनुभूती, उगवता नारायण जस जसा वर सरकत प्रकाश किरणांचा वर्षाव करत सारे तेज भूमंडळी उधळतो, समस्त मानवास आनंद देत जातो तेच तेज, तेच चैतन्य तोच आनंद ‘दिवाळी पहाट’ने रसिकांना दिला. गणरायाच्या प्रार्थनेने सुरुवात होऊन कार्यक्रमाला मिळत गेलेली उंची अगदी शेवटच्या ‘गोविंद बोलो हरि गोपाल बोलो’पर्यंत गायक कलावंतांनी टिकवून ठेवत रसिकांची दाद मिळविली.
दिवाळीचा आनंद द्विगुणित करता यावा यासाठी लोकमत सखी मंच, बाल विकास मंच व दिशा अकॅडमी व सातपुडा इन्फोटेक प्रा.लि.तर्फे मंगळवारी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजित काव्यरत्नावली चौकात करण्यात आले होते. हजारो पणत्या सखींच्याहस्ते प्रज्वालित करण्यात आल्या.
दीपोत्सवासह अमोल पाळेकर प्रस्तुत मराठी-हिंदीतील दिवाळी व भक्तीगीतांची ही सुमधूर मैफल गायक कलावंत आनंद अत्रे, अश्विनी जोशी यांनी बहारदार गीते सादर करून रसिकांची दाद मिळविली. यात जय जय रामकृष्ण हरि, ओंकार स्वरुपा, श्रीरामंचद्र कृपाळू, देवाचिये द्वारी, माझी रेणुका माऊली, बाजे रे मुरलीया बाजे, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, साईबाबांच्या लिलांवर आधारीत दीपावली मनाए सुहानी मेरे साई के हाथों मे जादु का पानी.. अशा एकाहून एक हिंदी, मराठी गीत, भक्तीगीतांना गीतांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या गोविंद बोलो हरि गोपाल बोलो या श्रीकृष्णाच्या आराधनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘बाजे रे मुरलीया बाजे’ला प्रचंड दाद
आनंद अत्रे व अश्विनी जोशी यांनी सादर केलेल्या या ‘बाजे रे मुरलीया बाजे’ गाण्याला मोठी दाद मिळाली. रागेश्री धुमाळ, आदित्य कुलकर्णी, स्वरांजय धुमाळ, मनोज गुरव यांनी साथसंगत केली. तर श्रीपाद कोतवाल यांनी उत्कृष्ट निवेदन केले.
बासरी वादनाने ‘दिवाळी पहाट’मध्ये भरले रंग
स्वरचैतन्य दिवाळी पहाट कार्यक्रमादरम्यान मनोज गुरव यांच्या बासरी वादनाने स्वरचैतन्यात रंग भरला. सलग सहा मिनिटे केलेल्या बासरी वादनाने रसिकांची दाद मिळविली.
सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरांची बरसात
काव्यरत्नावली चौकात पहाटे रसिकांना सहपरिवार फक्त एक पणती घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक जण सहकुटुंब एक एक पणती घेऊन ती प्रज्ज्वालीत करत कार्यक्रमात सहभागी होत होते. हळू हळू रसिकांच्या उपस्थितीने हा परिसर पूर्ण भरून गेला आणि संगीताची ही मैफल रंगत गेली.
या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, वरिष्ठ महाव्यवस्थापक प्रविण चोपडा यांच्यासह शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.