ड्युरा सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सच्या माध्यमातून ऑक्सिजन तुटवड्यावर होणार मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:00+5:302021-07-08T04:13:00+5:30
जळगाव : मोहाडी रस्त्यावरील शासकीय महिला रुग्णालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने २० ड्युरा सिलिंडर आणि १४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध ...
जळगाव : मोहाडी रस्त्यावरील शासकीय महिला रुग्णालयात इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीने २० ड्युरा सिलिंडर आणि १४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स उपलब्ध करून देण्यात आले असून, या ठिकाणी ऑक्सिजन बँक उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष अभिजित राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामाध्यमातून भविष्यात ऑक्सिजन तुटवड्यावर मात करता येणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. निकुंभ, शासकीय महिला रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ. तासखेडकर, डॉ. विलास मालकर, डॉ. सतीश सुरळकर, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सहसचिव राजेश यावलकर, कार्यकारिणी सदस्य अनिल शिरसाळे, डॉ. अपर्णा मकासरे, पुष्पा भंडारी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक गनी मेमन यांनी केले. भविष्यात ऑक्सिजनची अडचण निर्माण होऊ नये म्हणून ऑक्सिजन बँक या संकल्पनेला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, डॉ. पंकज आशिया यांनीही मनोगत व्यक्त केले.
सर्वांच्या सहकार्याने कोरोनावर मात
सर्वच सामाजिक संस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे व जळगावकरांनी ठेवलेल्या विश्वासामुळे कोरोना संसर्गावर मात करू शकलो, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले. सूत्रसंचालन रेडक्रॉसच्या जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा यांनी केले, तर विनोद बियाणी यांनी आभार मानले.