वर्षभरात जिल्ह्यात १४१२ चोऱ्या, ३७७ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:28+5:302021-01-17T04:14:28+5:30
जिल्ह्यात मागील वर्षभरात १४१२ चोऱ्या झाल्या असून ३७७ घरफोड्या झालेल्या आहेत. त्यापैकी फक्त ७६ घरफोड्या तर ४०६ चोऱ्या उघड ...
जिल्ह्यात मागील वर्षभरात १४१२ चोऱ्या झाल्या असून ३७७ घरफोड्या झालेल्या आहेत. त्यापैकी फक्त ७६ घरफोड्या तर ४०६ चोऱ्या उघड झालेल्या आहेत. अवघे २० ते २६ टक्केच गुन्हे उघड झालेले आहेत. जबरी चोरीच्याही १४५ घटना घडल्या असून त्यापैकी फक्त ८९ गुन्हे उघड झालेले आहेत. त्याशिवाय एकाच वर्षात ५३३ दुचाकी चोरीला गेलेल्या आहेत. त्यापैकी ९५ दुचाकींचा शोध लागलेला आहे. गेल्या आठवड्यात तर सलग तीन दिवस घरफोडीच्या घटना घडल्या.
लोकमतचे आहे लक्ष
पोलिसांकडून आपआपल्या हद्दीत गस्त घातली जाते. प्रभारी अधिकारी तसेच दुय्यम अधिकारी देखील रोटेशन पध्दतीने आपआपल्या हद्दीत गस्तीवर असतात तर प्रभारी अधिकारी आठवड्यातून एकदा संपूर्ण शहर अर्थात उपविभागात गस्तीवर असतात. निर्भया व दामिनी पथके शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, बाजार, मेहरुण तलाव व मोहाडी रोड या भागात गस्तीवर असतात. शाळा सुरु होण्याच्यावेळी व सुटण्याच्यावेळी निर्भया पथकाचे चारचाकी वाहन हे शाळेच्या बाहेरच थांबून असते. रात्रीच्या १ वाजेनंतर एकदा पोलिसांचे वाहन येत असल्याची माहिती रायसोनी नगरातील सुरक्षा रक्षक मुकेश जाधव यांनी सांगितले. भास्कर मार्केट परिसरात रात्री दर दोन तासांनी पोलिसांचे गस्ती वाहन रस्त्याने सायरन वाजत येत असल्याची माहिती सुरक्षा रक्षक जयराम पाटील यांनी सांगितले. दरम्यान, एमआयडीसीतही दिवसा व रात्री नियमितपणे पोलीस गस्त घालतात, भारत पेट्रोलियमजवळ गस्तीचा फोटो काढून ते वरिष्ठांना पाठवितात, अशी माहिती अकील शेख यांनी दिली.
कोट...
गस्तीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनचे कर्मचारी नेमण्यात आलेले असतात. प्रभारी अधिकारी यांनाही गस्त करावी लागते. स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा व उपविभागीय अधिकारी यांनाही गस्त सक्तीची आहे. अधिकाऱ्यांच्या गस्तीमुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असते व गस्तीकडे दुर्लक्ष होत नाही. चोरी, घरफोड्या रोखण्यासह छेडखानी व इतर अनुचित प्रकारांना त्यामुळे आळा बसतो.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक