लॉकडाऊननंतर शहरात धूलिकणांचे प्रमाण पुन्हा वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:15 AM2021-04-02T04:15:46+5:302021-04-02T04:15:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील खराब झालेले रस्ते व त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे शहरातील हवेच्या प्रदूषणात ...

Dust levels rose again in the city after the lockdown | लॉकडाऊननंतर शहरात धूलिकणांचे प्रमाण पुन्हा वाढले

लॉकडाऊननंतर शहरात धूलिकणांचे प्रमाण पुन्हा वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील खराब झालेले रस्ते व त्यामुळे उडणाऱ्या धुळीमुळे शहरातील हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शहरातील धूलिकणांचे प्रमाणात वाढ होत असून, सद्य:स्थितीत शहरातील वातावरणात ७५ टक्के धूलिकणांचे प्रमाण वाढले आहे. हवेच्या प्रदूषणात नापण्यात येणाऱ्या यांत्रिक भाषेत हे प्रमाण जरी समाधानकारक असले तरी येणाऱ्या काळात हे प्रमाण १०० पेक्षा अधिक जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २८ ते ३० मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. त्या तीन दिवसांत शहरातील धूलिकणांचे प्रमाण ३५ ते ४० टक्‍क्‍यांवर आले होते. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर प्रमाण पुन्हा ७० टक्‍क्‍यांपेक्षा पुढे गेले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे रस्त्यांवर वाहतूक वाढल्यास शहरातील धूलिकण यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. यात शहरातील खराब झालेले रस्तेदेखील मुख्य कारण असून, यावर आता वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील बांधकाम अभियंता विनायक काळे यांनी याबाबत महापौर जयश्री महाजन यांना निवेदन देऊन शहरातील वाढत जाणारे हवेचे प्रदूषण रोखण्याबाबत काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

हवेचे प्रदूषण होण्याचे मुख्य कारण

१. शहरातील खराब झालेले रस्ते

२. शहरात जलद गतीने होणारे बांधकाम

३. शहरातील बांधकामांमुळे वृक्ष लागवडीकडे होणारे दुर्लक्ष

४. शहरात अनेक भागांमध्ये लाकूड व कचरा जाळल्यामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम

शहरात वाढत जाणाऱ्या हवेच्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होण्याची, हवेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात. यासह डोळ्यांचे अनेक विकार उद्भवू शकतात. तसेच घशाचे विकारदेखील होऊ शकतात. हवेच्या प्रदूषणामुळे केवळ मानवी जीवनावर नाही, तर वृक्षांच्या जीवनावरदेखील परिणाम होतो. हवेच्या प्रदूषणामुळे वृक्षांची वाढदेखील थांबते.

हवेचे प्रदूषण रोखण्यासाठीचे उपाय

१. शहरातील हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांची स्थिती चांगली पाहिजे.

२. तसेच हवेचे प्रदूषण होणार नाही अशाच वाहनांचा वापर करणे गरजेचे आहे.

३. हवा प्रदूषण ॲक्ट १९८१ ची प्रभावी अंमलबजावणी करून हवेचे प्रदूषण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करणे गरजेचे.

४. महापालिका प्रशासनाने शहरातील विविध भागात हवेचे प्रदूषण मोजणारे यंत्र बसविणे गरजेचे. यामुळे या भागातील प्रदूषणाची माहिती घेऊन ते नियंत्रण करण्यासाठी काम करता येऊ शकते.

५. शहरात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. केवळ वृक्ष लागवड न करता त्या वृक्षाची निगा राखणेदेखील तेवढेच गरजेचे.

६. वाहनांचा कमीत कमी वापर करून पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करणे गरजेचे.

७. कोणताही कचरा जाळणाऱ्यावर त्वरित कारवाई करणे.

कोट..

शहरातील वाढत जाणारे हवेचे प्रदूषण हे येणाऱ्या काळात अधिक भीषण होऊ शकते. यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळली पाहिजे. यासह मनपा प्रशासनाने लक्ष दिल्यास हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.

- विनायक काळे, स्थापत्य अभियंता, जळगाव

Web Title: Dust levels rose again in the city after the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.