धुळ्याचे ‘व्हाईट हाऊस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:00 AM2020-03-01T01:00:24+5:302020-03-01T01:00:42+5:30
धुळे येथील पहिले शासकीय ग्रंथभवन साकारले आहे. याविषयी लिहिताहेत ‘लोकमत’चे उपसंपादक अतुल जोशी...
व्हाईट हाऊस म्हटल्याबरोबर अमेरिकेच्या राष्टÑाध्यक्षांचे निवासस्थान चटकन डोळ्यासमोर येते. मात्र धुळ्यातही ‘व्हाईट हाऊस’ साकारले आहे. मात्र हे कार्यालय अथवा निवासस्थान नाही, तर खान्देशातील पहिले वहिले शासकीय ग्रंथ भवन आहे. या ग्रंथभवनातच अभ्यास करून जिल्ह्यातील अनेक तरूण-तरूणी भविष्यातील आयएएस व आयपीएससह अधिकारी होण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हे ग्रंथभवन अर्थात ‘व्हाईट हाऊस’ धुळ्याचे ‘ज्ञान’ केंद्र झालेले आहे.
धुळ्यात पूर्वी अगदी जुनाट शासकीय ग्रंथालय होते. मात्र आता तब्बल अडीच कोटी रूपये खर्च करून महाराष्टÑातील पहिले स्वमालकीचे ग्रंथभवन उभारण्यात आलेले आहे. या ग्रंथभवनात तरूण-तरूणींसह ज्येष्ठांसाठी पुस्तक वाचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
गेल्या काही वर्षांपासून तरूणांचा कल आयएएस, आयपीएससह विविध विभागाचे अधिकारी होण्याकडे वाढलेला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थीही मागे नाहीत. या अभ्यासू तरूणांची सोय व्हावी म्हणून याठिकाणी स्वतंत्र स्पर्धा परीक्षा विभाग सुरू करण्यात आलेला आहे. युपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांसाठी येथे स्वतंत्र व्यवस्था आहे. याशिवाय दहावी-बारावीचे विद्यार्थीही याच ठिकाणी अभ्यास करीत असतात. दररोज किमान ३५० विद्यार्थी याठिकाणी अभ्यासासाठी येत असतात. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
गटचर्चेचा राबविला जातो उपक्रम स्पर्धा परीक्षेचा केवळ अभ्यासच नाही, तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातून मुलाखतीची भीती घालविण्यासाठी याठिकाणी दररोज मुला-मुलींसाठी स्वतंत्र गटचर्चेचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमधूनच ग्रुप लीडरची निवड केली जाते. ग्रुपलीडर विद्यार्थ्यांना देशात, राज्यात चर्चेत असलेल्या एखाद्या ज्वलंत (करंट) विषयावर बोलण्यास भाग पाडतो.
गटचर्चेत सहभागी होणाऱ्यांना मराठीसोबतच हिंदी, इंग्रजीत बोलण्यास प्रवृत्त केले जाते. यामुळे विद्यार्थी धाडसाने आपले मत मांडतात. यातून त्यांच्यात मुलाखतीला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण केला जातो. ग्रंथालयात गटचर्चा घेण्याचा महाराष्टÑातील हा पहिलाच उपक्रम आहे.
विद्यार्थ्यांना जगातील शैक्षणिक साईट बघण्याची सुविधा
सध्याचे युग हे इंटरनेटचे आहे. कोणतीही माहिती पाहिजे असल्यास अनेकजण इंटरनेटचाच आधार घेत असतात. त्याला ‘शिक्षणक्षेत्र’ही अपवाद नाही. गरिब, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रत्येकवेळी सायबर कॅफेवर जाणे शक्य नाही. या गरिब विद्यार्थ्यांसाठी येथे डिजीटल विभाग सुरू केला आहे.
येथे विद्यार्थ्यांना जगभरातील जवळपास २५० विविध प्रकारच्या वेबसाईट पाहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या बेबसाईटच्या माध्यमातूनही विद्यार्थी अभ्यास करू शकतात. बेबसाईट पाहण्यासाठी या विभागात १५ संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
३६५ दिवस सुरू राहणारे ग्रंथालय
हे ग्रंथालय वर्षातील ३६५ दिवस सकाळी ८ ते रात्री १० असे जवळपास १४ तास खुले राहते. शासकीय सुटी अथवा रविवारी कर्मचाºयांची सुटी असते. मात्र विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी ग्रंथालय सुरूच असते अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली.
-अतुल जोशी, धुळे