कर्तबगार व धडाडीचे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:24+5:302021-03-16T04:17:24+5:30
जळगाव : विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तिम्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सोमवारी शिक्षण ...
जळगाव : विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांच्या रूपाने एक कर्तबगार व्यक्तिम्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सोमवारी शिक्षण व सामाजिक क्षेत्रातून व्यक्त करण्यात आली. यावेळी त्यांच्या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.
अत्यंत करड्या शिस्तीचे आणि कामातील गुणवत्तेला प्राधान्य देणारे कुलगुरू म्हणून त्यांची ख्याती असल्याचेही भावना अनेकांनी व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, त्यांच्या कुलगुरुपदाच्या कार्यकाळातील आठवणींनासुध्दा उजाळा दिला.
युवकांचा दीपस्तंभ हरपला...
विद्यार्थी केंद्रित शिक्षण, शेतकरी केंद्रित शेती, कौशल्य व संस्कारक्षक केंद्रित युवक तसेच रिटेल बिझनेस केंद्रित अर्थव्यवस्था व मानव केंद्रित सहयोगी समाजनिर्मिती या प्रा. डॉ. सुधीर मेश्रामांच्या पंचसूत्रीमुळे ते विद्यार्थ्यांचे दीपस्तंभ झाले होते. आज त्यांच्या जाण्याने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात खूप मोठी हानी झाली आहे. खान्देशातील सुमारे २०० पेक्षा अधिक संघटनांकडून त्यांचा गौरव झाला आहे.
- जयसिंग वाघ, साहित्य अभ्यासक
प्रा. डॉ. सुधीर मेश्राम राजा व्यक्तिमत्त्व
प्रा. डॉ. सुधीर मेश्राम हे एक कर्तबगार व धडाडीचे नेतृत्व असणारे व्यक्तिमत्त्व. अत्यंत वेगाने निर्णय घेऊन चांगले प्रकल्प विद्यापीठास उभारण्याचे श्रेय त्यांना दिले गेले पाहिजे. चांगल्या योजना त्यांनी आणल्या. त्यांच्या निधनामुळे राजा व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती आपल्यातून निघून गेली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- शिरीष बर्वे
झोपडपट्टीतून उगवलेला ज्ञानसूर्य मावळला...
अमरावतीच्या हमालपुरा या झोपडपट्टीतून शिकून-सवरून कुलगुरू पदापर्यंत पोहोचलेला हा मातीतून उगवलेला माणूस आज आपल्यात नाही़, हे स्वीकारण्याला मन धजावत नव्हते. त्यांनी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख देण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात केले. कर्तव्यदक्षपणा, वक्तशीरपणा, बाणेदार स्वभाव या गुणांनी एक उत्तम प्रशासक कसा असावा, याचे एक अद्वितीय उदाहरण ते होते. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाने घेतलेली उत्तुंग भरारी साऱ्यांना स्तिमित करणारी आहे.
- सत्यजित साळवे, माजी संचालक, विद्यार्थी विकास विभाग, विद्यापीठ
मेश्रामांचे जाणे धक्का देणारे
त्यांच्या भेटीच्या आठवणी अजूनही मनात आहेत. शिक्षणाधिकारी असताना इन्स्पायर्ड अवाॅर्ड प्रदर्शनासाठी प्रमुख उद्घाटक म्हणून त्यांना आमंत्रित केले होते. विज्ञानच खरी क्रांती घडवू शकते. ही क्रांती मानवी कल्याणासाठी उपयोगी पडली तरच विश्वाचे कल्याण होईल, असा शुभसंदेश त्यांनी दिला होता. विशेष म्हणजे, भावी विद्यार्थी वैज्ञानिकांसाठी संपूर्ण वेळ देणारे मला वाटते हे पहिलेच कुलगुरू असावेत. माजी कुलगुरूंचे जाणे धक्का देणारे आहे. त्यांच्या जाण्याने विज्ञाननिष्ठ समाजाची, आंबेडकरी चळवळीची कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
- शशिकांत हिंगोणेकर, माजी शिक्षणाधिकारी