वाघुर व तापी मध्ये आढळले ड्वॉर्फ गौरामी मासे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:15 AM2021-01-23T04:15:51+5:302021-01-23T04:15:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील , जळगाव - आजपर्यंत केवळ फीश टँकसह उत्तरेकडील यमुना, गंगा व आसामधील नद्यांमध्ये आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अजय पाटील , जळगाव - आजपर्यंत केवळ फीश टँकसह उत्तरेकडील यमुना, गंगा व आसामधील नद्यांमध्ये आढळून येणारा ड्वॉर्फ़ गौरामी या आकर्षक माशांची नोंद जळगाव जिल्ह्यातील वाघूर व तापी नदीत झाली आहे. या दोन्ही नद्यांमध्ये हे मासे मोठ्या संख्येने वाढत आहेत. वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य गौरव शिंदे यांनी हे संशोधन केले असून, त्यांच्यासह या संशोधनात वन्यजीव संरक्षण संस्थेचे बाळकृष्ण देवरे, राहुल सोनवणे व प्रसाद सोनवणे यांचाही सहभाग यामध्ये आहे.
वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य गौरव शिंदे हे वाघूर व तापी नदीमधील दुर्मीळ मासे यांच्यावर संशोधन करीत आहे. २०१८-१९ मध्ये वाघूर नदीच्या परिसरात पाहणी करत असताना, हे मासे आढळून आले आहेत. काही दिवस यावर संशोधन केल्यानंतर गौरव शिंदे यांचा संशोधन पेपर ‘बायोइन्फोलेट’ या आंतराष्ट्रीय शोधनिबंध पुस्तिकेत प्रकाशीत झाला आहे. हे मासे पडताळणी करण्यासाठी काही संशोधकांचे शोधनिबंधाचे वाचन देखील केले. तसेच चेन्नई येथील संशोधक डेटा महंतराज यांच्याकडून पडताळणी करून, त्यांनी ही या संशोधनाला दुजोरा दिला आहे.
याआधी आसाम, त्रिपुरासह गंगा नदीत नोंद
पश्चिम-दक्षिण भारतातील नद्यांमध्ये देखील हे मासे आढळून येत नाहीत. त्रिपुरा, आसाम मधील नद्यांसह उत्तर भारतातील गंगा व यमुना या नद्यांमध्येच हे मासे आढळून येतात. यासह नेपाळ, पाकिस्तान व बांग्लादेशमध्ये देखील हे मासे आढळून येतात.
मासे यांचे वैशिष्ट
हे मासे दिसायला आकर्षक असून, त्यांची लांबी ही ६ सेंमी तर रुंदी ४ ते ५ सेमी इतकी असते. त्यांचे वैज्ञानिक नाव ट्रायगोस्टर लालीयुस असे असून, कॉमन नाव ड्वॉर्फ़ गौरामी असे आहे. नद्यांमध्ये थांबलेल्या पाण्यात वाढलेल्या वनस्पतीमध्ये हे मासे आढळतात. अंगावर लाल व निळ्या रंगाचे ठीपके असतात. तसेच हे मासे आकर्षक असल्याने त्यांचा वापर फीशटँक मध्ये केला जातो. तसेच खाण्यासाठी या माशांचा वापर होत नाही. तरीही पाहणीदरम्यान वाघूर नदीच्या काठावर काही स्थानिक नागरिक भात मासे म्हणून हे मासे भाजून खाताना आढळून आले.
वाघूर, तापी नदीत हे मासे आले तरी कोठून ?
यांचा वापर फिश टँकमध्ये होत असतो. काहींनी हे मासे नदीत फेकण्याची शक्यता आहे. त्यातुन त्यांची संख्या वाढली असण्याची शक्यता आहे. वाघूर व तापी नदीत हे मासे वाढत असून, पावसाळ्यात त्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते अशीही माहिती गौरव शिंदे यांनी दिली.