जळगावात पत्याच्या अड्डयावर झालेल्या वादानंतर प्रौढाचा संशयास्पद मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:19 PM2018-02-27T13:19:16+5:302018-02-27T13:19:16+5:30
जिजाऊनगरातील रहिवासी
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. २७ - पत्याच्या अड्डयावर झालेल्या वादानंतर घरातून गायब झालेले तुळशीराम मलखान राठोड (वय ४५ रा. जिजाऊ नगर, वाघ नगर, जळगाव, मुळ रा.मांडवे दिगर, ता. भुसावळ) यांचा सोमवारी सकाळी सावखेडा शिवारात रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. राठोड यांचा खून झालेला असून आत्महत्या भासविण्यासाठी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याबाबत नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळशीराम राठोड यांंचा रविवारी दुपारी चार वाजता वाघ नगर परिसरातील पत्याच्या अड्ड्यावर वाद झाला होता. मस्करी करताना राठोड यांनी एकाला मारले होते.
त्यानंतर मार खाणाºया व्यक्तीने हा प्रकार त्याच्या भावाला सांगितला. थोड्या वेळाने दोन्ही भावंडे राठोड यांना शोधत आले. त्यांना बेदम मारहाण करुन ‘तुला बघूनच घेतो’ रात्री येताच अशी धमकी देत निघून गेले होते. या घटनेनंतर राठोड प्रचंड तणावात होते. घरी आल्यानंतर मुलांना व नातेवाईकांना त्यांनी हा प्रकार सांगितला. दरम्यान, रात्री आठ वाजता मुलाजवळून पाचशे रुपये घेऊन मी आलोच असे सांगून घराबाहेर पडले, ते परतलेच नाहीत. सकाळी त्यांचा मृतदेहच आढळून ैआला.
दरम्यान, राठोड यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पत्नीची शुध्द हरपली. घरी इतकी गर्दी कशासाठी झाली? म्हणून ते विचारत होते. नातेवाईकांनी उशिरापर्यंत पतीच्या मृत्यूची माहिती त्यांना दिलीच नाही. तिन्ही मुलांनी मात्र जिल्हा रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला. शालक रतन पवार अन्य लोकांनी या मुलांना धीर दिला.
का वाटतो घातपाताचा संशय?
संकट काळात धावून जाणारे तुळशीराम राठोड हे आत्महत्या करु शकत नाही असा ठाम विश्वास मुलगा व शालक रतन पवार यांनी व्यक्त केला आहे. राठोड यांच्या डोक्याला, तोंडाला मार लागला आहे. त्यामुळे त्यांचा घातपातच झाला आहे. आत्महत्या केली असती तर त्यांचा मृतदेह फरफटत गेला असता किंवा शरीराचे तुकडे झाले असते असा कोणताच प्रकार येथे झालेला नाही. शिवाय वाद घालणाºयांनी धमकी दिली होती, त्यामुळे हा खूनच असल्याचा आरोप पवार यांनी केला. अंत्यविधी झाल्यानंतर उपअधीक्षक सचिन सांगळे यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जखमा असलेला मृतदेह आढळला
वडील घरी आले नाही म्हणून मुलगा लखन, पवन व राजा या तिघांनी रात्रभर त्यांचा शोध घेतला. सोमवारी सकाळी ते रेल्वे रुळाकडे शोध घेत असताना ट्रॅकमन धनराज रामचंद्र ठाकरे यांना सावखेडा शिवारात जळगाव-शिरसोली लाईनवर खांब क्र.४१५/१२-१४ येथे अंगावर जखमा असलेला मृतदेह आढळून आला. त्यांनी तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान, मुलगा लखन याने घटनास्थळावरच वडीलांचा मृतदेह ओळखला. तेथून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.राठोड हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.