मोहाडीच्या सुकलाल वाघ यांचा ई-गृहप्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:21 AM2021-06-16T04:21:29+5:302021-06-16T04:21:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई - गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील रमाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महा आवास अभियान ग्रामीण अतंर्गत ई - गृहप्रवेश कार्यक्रमातंर्गत जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील रमाई आवास योजनेचे लाभार्थी सुकलाल मधुकर वाघ यांचा ई-गृहप्रवेश पार पडला.
राज्यभराच्या लाभार्थींचा हा ऑनलाईन गृहप्रवेश सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थिती मुंबईत पार पडला. यात जळगावातील पाच लाभार्थींना घरकुलाच्या चाव्या देण्यात आल्या.
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनांची अंमलबजावणी गतिमान करणे व त्यामध्ये गुणवत्ता आणणेसाठी २० नोव्हेंबर,२०२० ते ३१ मार्च,२०२१ या कालावधीत राज्यात महा आवास अभियान ग्रामीण राबविण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन पार पडलेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डिगंबर लोखंडे यांच्यासह विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
शासन, प्रशासनाचे मानले आभार
सुरुवातील आम्ही अनेक वर्षे भाड्याच्या घरात राहत होतो. स्वत:च्या घराचे स्वप्न शासनामुळे पूर्ण झाले आहे. रमाई आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर झाले आणि आज ई-गृहप्रवेश झाल्याचा आनंद आहे. याबद्दल मोहाडी ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी सहकार्य केल्यामुळे रत्ना वाघ यांनी शासन आणि प्रशासनाचे यावेळी आभार मानले.
या लाभार्थ्यांना मिळाली चावी
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध घरकुल योजनांचे लाभार्थी देवचंद सोनू सुर्यवंशी, संतोष पंडित वाघ, शांताराम रामा तायडे, गंगुबाई देवराम सोनवणे, ज्ञानेश्वर दौलत सोनवणे या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते घराची चावी व वृक्ष देऊन घराचा ताबा दिला.