पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:33 AM2022-03-08T11:33:52+5:302022-03-08T11:35:33+5:30

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे.

E-KYC of PM Kisan Yojana is a headache for farmers in Jalgaon | पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

पीएम किसान योजनेची ई केवायसी शेतकऱ्यांसाठी ठरतेय डोकेदुखी!

Next

महिंदळे, ता. भडगाव : केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या अकरावा हप्त्याचा लाभ घेण्यासाठी व बोगस शेतकरी शोधण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. मात्र केवायसी करण्याकरिता शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. केवायसी न केल्यास पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकरी तासनतास सीएससी सेंटरवर बसलेले दिसतात.

पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. शेतकऱ्यांना शेती कामात आर्थिक मदत मिळावी, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. देशभरातील ११ कोटींहून अधिक शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, अनेकांनी बोगस कागदपत्रे जमा करून योजनेचा लाभ घेतला होता. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनास आली असून, आता यावर निर्बंध यावेत म्हणून नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ई-केवायसीची पूर्तता केली तरच अकरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु सध्या ई केवायसी करण्याकरिता अनेक अडथळे येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सीएससी सेंटरमध्ये तासनतास बसावे लागत आहे. कधी साईट जाम तर कधीकधी ई केवायसी चालू असताना अचानक बंद होत आहे तसेच काही शेतकऱ्यांचे हाताच्या बोटाचे ठसे उमटत नसल्याने त्यांना केवायसी करिता मुकावे लागत आहे.

३१ मार्च शेवटची तारीख
देशभरात ११ कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादीनुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये, यासाठी आता ई-केवायसीची अट घालण्यात आली आहे. १ जानेवारी रोजी या योजनेतील १०वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण, आता केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे ११व्या हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना ३१ मार्चपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कधी साईट चालत नाही तर कधी केवायसीवेळी हाताच्या बोटाचे ठसेच येत नसल्यामुळे केवायसी कशी पूर्ण करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहू लागला आहे.

Web Title: E-KYC of PM Kisan Yojana is a headache for farmers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.