अवकाळी पावसाने केळी बागांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 04:28 AM2019-11-16T04:28:11+5:302019-11-16T04:28:17+5:30
केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
किरण चौधरी
रावेर (जि. जळगाव) : गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे घटलेले केळीचे उत्पादन त्यातच यावर्षी ओल्या दुष्काळामुळे बागांची वाढ खुंटल्याने जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा भाव आहे मात्र पीकच आलेले नाही, अशी स्थिती केळी उत्पादकांची झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादकांना सरकारी मदतीची प्रतिक्षा आहे.
गेल्यावर्षी दुष्काळाच्या भीषण दाहकतेत ट्युबवेल व विहीरींची पातळी तब्बल १०० मीटरच्या खाली घसरली होती. उन्हाळ्यात अतिउष्ण तापमानामुळे केळीबागा पूर्णत: उद्ध्वस्त झाल्या होत्या. देशभरातील तीन चतुर्थांश केळी उत्पादन रावेर, यावल, मुक्ताईनगर व चोपडा परिसरात होते. उत्पादनाअभावी यंदा केळीचे बाजारभाव १ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले. तुरळक शेतकऱ्यांना बाजारभावांचा लाभ झाला असला तरी, हाती उत्पादनच नसल्याने केळीचे विक्रमी बाजारभाव शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले नाहीत.
जुलै ते नोव्हेंबर दरम्यान सातत्याने ढगाळ वातावरण व संततधार पाऊस सुरू होता. सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे पीक वाढीची प्रक्रिया खुटली. शेतजमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने वाफसा होवू शकला नाही. त्यामुळे मुळांच्या कक्षेत सतत ओलावा राहिल्याने केळीच्या मुळांचीही वाढ खुंटली आहे.
>खरेदीला व्यापाºयांची ना
केळी बागांवर करपा घोंघावत आहे. केळीबाग उपटून फेकाव्या लागल्या आहेत. केळीच्या घडांवर व दांड्यावर ‘पीटस्पॉट’ रोगाचा प्रादुर्भाव होवून काळे ठिपके पडत आहेत. त्यामुळे केळी अपरिपक्व अवस्थेत पिकत असल्याने खरेदीला व्यापारी नकार देत आहे.
>जुलै महिन्यापासून सतत पाच महिने ढगाळ वातावरण व पावसामुळे पाण्याचा निचरा न होणाºया जमिनीत वाफसा झाला नाही. करपा, पीटस्पॉट व सीएमव्हीची लागण झाल्याने केळीच्या उत्पादनासह गुणात्मक दर्जावरही परिणाम झाला आहे.
- डॉ. के. बी. पाटील, केळीतज्ज्ञ, जळगाव
केळी निसवल्याने व सकाळी थंडीमुळे केळी पानांवर दवबिंदू राहत आहेत. करपा निर्मुलनाच्या फवारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे
- सदानंद महाजन, निर्यातक्षम केळी उत्पादक, तांदलवाडी