वृत्तपत्रापासून साकारणार इको फ्रेण्डली मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 06:36 PM2018-09-08T18:36:08+5:302018-09-08T18:36:33+5:30
उपक्रम : संस्कृती फाउंडेशनचा यंदा पर्यावरण पूरक १० फूट उंच गणराय
भुसावळ, जि.जळगाव : संस्कृती फाउंडेशनतर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्यात येणार आहे. यंदा वृत्तपत्राच्या कागदापासून १० फूट उंचीची इको फ्रेण्डली गणेश मूर्ती बनविण्यात येत आहे.
गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे करण्यात येत आहे.
यंदा भुसावळकरांना संस्कृती फाउंडेशनचा आगळा वेगळा गणपती बघायला मिळणार आहे. गणपती संपूर्ण वृत्तपत्राच्या कागदापासून बविण्यात येत असून, सुमारे १० किलो वृत्तपत्राची रद्दी यासाठी वापरण्यात आलेली आहे. ह्या गणपतीचे आगमनसुद्धा पारंपरिक पद्धतीने केले जाईल आणि हा गणपती डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात स्थापित केला जाणार आहे. उद्यानात संपूर्ण ठिकाणी पर्यावरणाचे संदेश देण्यात येणार आहे आणि जनजागृती केली जाणार आहे. गणपतीचे दर्शन करणाऱ्या भाविकांना कापडी पिशवी भेट दिली जाणार आहे.
गणपती हा सात दिवसांचा असून त्या प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या संदेशातून प्रबोधन केले जाणार आहे.
विसर्जनासाठी निघणार जनजागृतीपर दिंडी
पारंपरिक पद्धतीने दिला जाणारा गणपतीला निरोप आठव्या दिवशी गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने केले जाणार आहे. ह्यात पर्यावरण व स्वच्छता जनजागृतीपर दिंडीचे आयोजण करण्यात येणार आणि माधवाश्रमासमोरील महाराणा प्रताप चौकात पर्यावरण संवर्धनावावर कीर्तन होईल. त्याच ठिकाणी आमदार संजय सावकारे व रजनी सावकारे यांच्या हस्ते गणरायाचे विसर्जन केले जाणार आहे.
आठव्या दिवशी दिंडीची सुरवात डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानापासून होईल. यात नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी तसेच विविध मान्यवर व नगरसेवक यांचा समावेश असेल.
कार्यकर्त्यांकडून मूर्र्तींची घडण
भुसावळ शहरात नागरिकांमध्ये स्वच्छता, पर्यावरण जास्तीत जास्त प्रमाणात जनजागृती व्हावी ह्याच अनुषंगाने हा आगळ्या वेगळ्या गणपतीची स्थापना केली जाणार आहे. गणपती मूर्तीची निर्मिर्तीसाठी स्वत: संस्कृती फाउंडेशनचे सदस्य परिश्रम घेत आहेत.