टाकाऊ वस्तूंपासून बनविले पर्यावरणस्नेही घरकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:12 AM2021-06-20T04:12:41+5:302021-06-20T04:12:41+5:30
-नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, चाळीसगाव. जिजाबराव वाघ लोकमत न्यूज नेटवर्क चाळीसगाव : ग्रामीण भागात घरकुल योजनेत बांधण्यात येणाऱ्या घरासाठी ...
-नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, चाळीसगाव.
जिजाबराव वाघ
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : ग्रामीण भागात घरकुल योजनेत बांधण्यात येणाऱ्या घरासाठी निश्चित आराखडा आहे. तथापि, लाभार्थी आपल्या सोयीनुसार ते बांधतात. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी टाकाऊ वस्तूंचा अधिक वापर करीत धुळे रोडस्थित सिंचन विभागाच्या आवारात ‘डेमो हाऊस’ उभारले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाआवास ग्रामीण अभियानाचा आढावा घेतल्यानंतर याच डेमो हाऊसचे सादरीकरण झाल्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले. त्याच्या निर्मितीविषयी साधलेला हा संवाद. ...
प्रश्न : डेमो हाऊसची कल्पना कशी सुचली ?
वाळेकर : पंतप्रधान आवास योजनेसह राज्य शासनाच्या शबरी व रमाई महाआवास ग्रामीण अभियानात घरकुल कसे असावे, याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, लाभार्थी हे निर्देश पाळत नाहीत. आपल्या सोयीप्रमाणे ते घर उभारतात. म्हणूनच कमी खर्चात वाळू, सिमेंट यांचा नगण्य वापर करीत टाकाऊ वस्तूंपासून डेमो हाऊस तयार करण्याची कल्पना आकारास आली. यासाठी जि. प.च्या सिंचन विभागातील उपअभियंता किरण बरे यांचेही सहकार्य मिळाले.
प्रश्न : पर्यावरणस्नेही घरकुल का म्हणायचे ?
वाळेकर : २७० स्क्वेअर फूट जागेत हे घर बांधता येते. यासाठी वाळू, सिमेंट, विटा हे परंपरागत साहित्य अत्यल्प म्हणजे पाच ते दहा टक्केच वापरले आहे. औष्णिक वीज केंद्रातील टाकाऊ राखेपासून रसायन वापरून विटा तयार केल्या जातात. डेमो हाऊससाठी याच विटा वापरण्यात आल्या आहे. आतील प्लास्टरही जिप्सममध्ये केले आहे. बैठक हॉल, किचन, शौचकुपी, स्नानगृह, ओटा अशा सुविधा या घरात साकारल्या आहे. पाणी, वाळू, सिमेंट आणि विटा याचा कमी वापर करून माफक खर्चात घर बनविले आहे. वाळूचा वापर होत नसल्याने पर्यायाने वाळू उपसा कमी होण्यास मदतच होईल, हे घर भूकंपरोधकही आहे. चाळीसगाव तालुक्यासाठी सहा हजारांहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ४२३५ घरे बांधली गेली आहे. यापुढे लाभार्थींना घर बांधण्यासाठी डेमो हाऊसचा चांगला उपयोग होईल. ग्रामीण भागातून लोक डेमो हाऊस पाहण्यासाठी येत आहेत.
प्रश्न : डेमो हाऊसनुसार घर बांधल्यास किती खर्च येतो ?
वाळेकर : आम्ही तयार केलेल्या घरानुसार जर लाभार्थीने घर बांधल्यास दोन लाख ६८ हजार रुपये खर्च येतो. सहा हजार वीट, तीन ब्रास वाळू, सात गोणी सिमेंट हा खर्च वाचतो. मजुरी मात्र नऊ हजार लागले. लाभार्थींना घरकुलासाठी १ लाख २० हजार रुपये मिळतात. यात अधिकचे दीड लाख रुपये टाकल्यास डेमो हाऊससारखे टुमदार घर उभे राहते.
प्रश्न : या डेमो हाऊसची अजून काय वैशिष्ट्ये सांगता येतील?
वाळेकर : शौचकुपीसाठी व इतर कामांसाठी वापरलेले घाण पाणी येथे शोषखाड्ड्याद्वारे साठविले जाते. असे दोन खड्डे बनविले जातात. पंधरा ते एक महिन्याच्या आत शोषखड्ड्यातील वासविरहित घाण खत म्हणून वापरता येईल. यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. छतावरील पाणीदेखील शोषखड्ड्याद्वारे जिरवता येणार आहे.
===Photopath===
190621\19jal_7_19062021_12.jpg
===Caption===
नंदकुमार वाळेकर