पाईपलाईनसाठी उचलला आर्थिक भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 03:52 PM2019-05-27T15:52:37+5:302019-05-27T15:53:11+5:30
नगरसेविकेचा पुढाकार : पाणी मिळाल्याने माळीवाड्यात समाधान
धरणगाव : शहरात पाण्याचे दुर्भिक्ष पाचविलाच पुजलेले आहे. शहरातील माळी वाड्यातील काही भागात जुन्या पाईपलाईनव्दारे पाणी पोहचत नसल्याने वॉर्डाच्या नगरसेविकेने नगरपालिकेकडून पाईपलाईन मंजूर करुन स्वत: खोदकाम व इतर प्लबींगचा आर्थिक भार उचलून नवीन जोडणी केल्याने अनेक वर्षानंतर माळीवाड्यातील काही भागातील अंगणापर्यंत पाणी पोहचल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
येथील मोठा माळीवाडा परिसरातील प्रभाग क्रमांक १ मधील काही भागात अनेक वर्षांपासून नळ जोडणी असतांनाही पाणी येत नव्हते. परिसरातील नागरिकांनी नगरसेविका तथा माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन यांची भेट घेवून ही समस्या मांडली. त्यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पाईप मंजूर करुन स्वत: अदमासे वीस हजार खर्च करुन खोदकाम व प्लबींग करुन रामायण मढी चौक ते बाजोट गल्ली , रामायण मढी पासुन तर संजय महाजन यांच्या घराकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या घरापर्यंत, बाजोट गल्ली ते फुलहार गल्ली कडुन महात्मा फुले चौक पर्यंत नवीन पाईपलाईनचे काम केल्याने या सर्व भागात पाणी आले. ज्या भागात अनेक वर्षापासून नागरीकांना पाण्याची समस्या निर्माण झाली होती ती समस्या सोडविल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त करुन त्यांचे आभार मानून सत्कार केला.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , युवासेना शहर संघटक लक्ष्मण माळी, शिवसेनेचे विजय महाजन, हरी महाजन , मोहन महाजन, भैय्या महाजन, भाऊसाहेब महाजन, पिंटु महाजन, गोलू महाजन व परिसरातील नागरिक उपस्थित होते.