कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:35 AM2017-09-12T00:35:19+5:302017-09-12T00:37:10+5:30
प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एका तरुण शेतकºयाने अतिशय कमी खर्चात इकोपेस्ट ट्रॅप (स्वयंचलित सापळा) बनविला आहे.
आॅनलाईन लोकमत, दि़ १२ - चुडामण बोरसे
जळगाव : प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एका तरुण शेतकºयाने अतिशय कमी खर्चात इकोपेस्ट ट्रॅप (स्वयंचलित सापळा) बनविला आहे. यामुळे शेतातील कीटकांवर नियंत्रण मिळविल्याचा त्यांचा दावा आहे.
कांतीलाल भोमराज पाटील (रा. मंगरूळ, ता. चोपडा) असे या तरुण शेतकºयाचे नाव आहे़ पिकांवर पडणाºया अळ्या किंवा कीटक बºयाच वेळा रासायनिक औषधांना दाद देत नाहीत, असे अनेकवेळा घडत असते. त्यावर त्यांनी उपाय शोधून काढला आहे. पाटील यांचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झालेले आहे़ सन २०१० मध्ये झालेल्या गारपिटीत त्यांच्या शेतातील केळीचे मोठे नुकसान झाले. २०१४ मध्ये टरबूज लावले. व्हायरसमुळे त्याचेही नुकसान झाले. तरी त्यात पाटील यांनी उभारी घेण्याचे ठरविले. यातूनच त्यांनी इको पेस्ट ट्रॅप बनविला.
हा प्रयोग सर्वप्रथम त्यांनी आपल्या शेतात केला. तुरीवर असलेल्या पतंग आणि फळमाशी आदी किटकांवर या सापळ्यामुळे ७० टक्के नियंत्रण मिळविल्याचे त्यांना आढळून आले.
इतर शेतकºयांना इकोपेस्ट ट्रॅपचा फायदा व्हावा यासाठी आणखी ट्रॅप बनविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी बँकांकडे कर्ज मागितले. पण बँकांनी नकार दिला. मग आहे त्याच पैशांतून हे ट्रॅप बनविण्यास सुरुवात केली. हा ट्रॅप आता राज्यासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातही जाऊ लागला आहे. या ट्रॅपसाठी त्यांनी पेटंटची नोंदणी केली आहे. त्यांनी शेतात केळी, मका, कपाशीसह कटूरलेचाही प्रयोग केला. तो ही यशस्वी झाला आहे. पहिल्याच हंगामात त्यांनी जवळपास ८० किलो कटूरले विकले. केळीत त्यांनी आता टरबुजाचे आंतरपीक घेतले आहे.
असा आहे इकोपेस्ट ट्रॅप
या इकोपेस्ट ट्रॅपमध्ये ०.५ वॅटचा एलईडी दिवा लावलेला आहे. जो अंधार पडल्यावर आपोआप प्रकाशित होतो. सकाळी सूर्य उजाडल्यावर बंद होतो. त्यासाठी दिव्याला सेन्सर जोडण्यात आला आहे. पिवळ्या रंगाचे दोन चिकट सापळे बरोबर काटकोनात जोडून इकोपेस्ट ट्रॅप तयार करण्यात आला आहे. कीटक रात्री बाहेर पडल्यानंतर दिव्याचा प्रकाश पाहून इकोपेस्ट ट्रॅपकडे आकर्षित होतात आणि चिकटतात.
एक एकर क्षेत्रासाठी १० इकोपेस्ट ट्रॅप जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवर किंवा पिकाच्या उंचीनुसार शेतात लावले जातात़ एका ट्रॅपसाठी शेतकºयास साधारणत: २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. ट्रॅपला छोट्या सेलची व्यवस्था असून विजेची गरज नाही.
रासायनिक कीटकनाशकचा वापर न करता कीड नियंत्रणाचा प्रभावी उपाय आहे़ सापळा शेतात लावताना वीज जोडणीची गरज नाही़