सोन्याच्या शोरुमवर ED ची धाड; शरद पवारांसोबत असल्यानेच कारवाई झाल्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 07:59 PM2023-08-20T19:59:32+5:302023-08-20T20:02:20+5:30
याविषयी मनीष जैन म्हणाले की, सोन्याचा साठा नेला असला तरी काही दिवसातच आपण उपाययोजना करून शोरूम पुन्हा पूर्ववत सुरू करू
जळगाव/मुंबई - ईडीकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये रोख रकमेसह सोन्याचा साठाही ईडीने जप्त केला असला तरी काही दिवसातच सोने, हिरे व अन्य सर्व साठा उपलब्ध करून शोरूम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, असा विश्वास आरएल समूहाचे संचालक व माजी आमदार मनीष जैन यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला. जळगावमधील प्रसिद्ध आरएल समुहाच्या सोन्याच्या शोरुमवर मोठी कारवाई करण्यात आली. मात्र, या कारवाईमागे राजकीय षड्यंत्र असल्याची चर्चा रंगली आहे. ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासमवेत असल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याची चर्चा होत आहे.
आरएल समूहाच्या विविध फर्ममध्ये गुरुवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपासून सक्त वसुली संचालनालयाच्या पथकांकडून तपासणी करण्यात येऊन जळगाव, नाशिक, ठाणे येथील शोरूममधून रोख रकमेसह सोन्याचा साठा जप्त करण्यात आला. यामुळे संबंधित फर्ममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. तसेच, ग्राहकांना सोने उपलब्ध नसल्याने माघारी जावे लागत आहे.
याविषयी मनीष जैन म्हणाले की, सोन्याचा साठा नेला असला तरी काही दिवसातच आपण उपाययोजना करून शोरूम पुन्हा पूर्ववत सुरू करू. यात कर्मचाऱ्यांचे हाल होऊ देणार नाही की ग्राहकांना परत जाऊ देणार नाही. एवढ्या वर्षांची विश्वासाची परंपरा आपण खंडित होऊ देणार नाही, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. शोरूममधील सोने नेण्यात आले. मात्र, चांदीचा साठा कायम असल्याने शनिवारी ग्राहकी कायम होती.
राजकीय षडयंत्राची चर्चा
आरएल समूहावर ईडीने केलेली कारवाई हे राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. रावेर व जळगाव मतदारसंघातून मनीष जैन यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. तसेच माजी खासदार ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादीचे खजिनदार राहिले व आताही ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याने ही कारवाई केली जात असल्याचीही चर्चा आहे.
कर्मचाऱ्यांनी घेतली ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट
आरएल समूहाच्या जळगाव, ठाणे, नाशिक येथील फर्ममधूनही रोख रक्कम, सोन्याचा साठा जप्त करण्यात आल्याने सोन्याचा साठा नसल्याने शोरूम बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जळगावातील कर्मचायांनी ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. सोन्याचा सर्वच साठा नेत असल्याने दुकान कसे चालणार व आमच्या रोजगाराचे काय, असा प्रश्न केला. मात्र याविषयी वरिष्ठांशी चर्चा करावी लागेल, असे ईडीच्या अधिकायांनी त्यांना सांगितले.