ईडीचे पथक चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:03+5:302021-07-08T04:13:03+5:30
जळगाव : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीचे पथक चार दिवसापूर्वीच जळगाव व मुक्ताईनगरात येऊन गेल्याची माहिती सूत्रांकडून ...
जळगाव : पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणात ईडीचे पथक चार दिवसापूर्वीच जळगाव व मुक्ताईनगरात येऊन गेल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. पथक जावई गिरीश चौधरी यांच्या रिंगरोड यांच्या घरी गेले होते, मात्र तेथे कुलूप असल्याने पथक मुंबईत गेले व तेथे समन्सची बजावणी केल्याचे समजते.
ईडी लावली तर सिडी लावण्याचा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांना हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. याआधी भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चौकशी केली होती.
काय आहे भोसरी जमीन घोटाळा?
फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे ३.१ एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप २०१६ मध्ये झाला होता. ३१ कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ ३.७ कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.
गिरीश चौधरी मुळचे ममुराबाद येथील
माजी एकनाथ खडसे यांचे जावाई गिरीश चौधरी यांना ईडीने अटक केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील खडसे व समर्थकांना मोठाच धक्का बसला आहे. गिरीश चौधरी हे जळगाव अथवा मुक्ताईनगरात क्वचित आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खडसे यांच्या जेष्ठ कन्या शारदा खडसे यांच्याशी गिरीश चौधरी यांचा विवाह सन २००२ मध्ये झाला. चौधरी हे मूळचे ममुराबाद ता. जळगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांचे आई -वडील असे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक होते. गिरीश हे आय.आय.टी. आहेत. काही वर्षापूर्वी ते ऑस्ट्रेलिया, लंडन व नंतर अमेरिकेत होते. ते अनिवासी भारतीय असल्याची माहिती मिळाली.