खाद्यतेलाचा काहीसा दिलासा, कांदा आणतोय डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:12 AM2021-06-28T04:12:46+5:302021-06-28T04:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात गेल्या १० दिवसांपासून घसरण झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत असलेल्या खाद्यतेलाच्या भावात गेल्या १० दिवसांपासून घसरण झाली असून यामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे; मात्र दुसरीकडे कांद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने आर्थिक भार वाढत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात सातत्याने वाढ होत जाऊन तेलाने उच्चांकी गाठली होती. मात्र गेल्या १० ते १२ दिवसात खाद्यतेलात २० रुपये प्रतिकिलोने घसरण झाली आहे. यामध्ये सोयाबीन तेल १४५, शेंगदाणा तेल- १७०, सूर्यफूल तेल १६०, पामतेल १२८ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. तीळ तेल मात्र २०० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. तेलाचे भाव कमी होण्यासह इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत.
किराणा माल स्थिर
डाळींचे भाव स्थिर असून तूरडाळ १०० ते ११५, मूगडाळ १०० ते ११५, हरभरा डाळ ७० ते ८०, उडीद डाळ १०५ ते ११५ रुपये प्रतिकिलोवर आहे. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.
कोथिंबीरचे भाव कमी
पावसाळा सुरू झाल्यानंतर मध्यंतरी कोथिंबीरचे भाव वाढून ते ८० रुपये किलोवर पोहोचले होते. आता ते ४० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. दुसरीकडे मेथी ५० रुपये किलोवर असून टोमॅटोचे भाव २० रुपये प्रतिकिलोवर आहे.
दिवसेंदिवस वाढताहेत कांद्याचे भाव
बटाट्याचे भाव २० रुपये प्रतिकिलोवर आहेत. मात्र दुसरीकडे कांद्याचे भाव वाढत असून सध्या चांगला कांदा ३५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरची ४० रुपये प्रतिकिलोवर आहे.
खाद्यतेलाचे भाव कमी झाल्याने दिलासा आहे. मात्र कांद्याचे भाव वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. इतर किराणा साहित्य स्थिर असल्याने दिलासा आहे.
- सतीश शिरसाठ, ग्राहक
खाद्यतेलाचे भाव अनेक दिवसांनंतर कमी झाले आहेत. सध्या लोणच्यासाठी तेलाला मागणी आहे. डाळींसह इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत.
- रमेश वाणी, व्यापारी
कांद्याचे भाव वाढले आहेत. दुसरीकडे भाववाढ झालेल्या कोथिंबीरचे भाव कमी झाले आहेत. इतर भाज्या स्थिर आहेत.
- शरद सोनवणे, भाजीपाला विक्रेते