खाद्यतेलाने महागाईत ‘तेल’ ओतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:50+5:302021-04-01T04:16:50+5:30
जळगाव : अवकाळी पावसामुळे सोयाबीन तसेच शेंगदाण्याचे झालेले नुकसान, शेंगदाण्याची सुरू झालेली निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात झालेली ...
जळगाव : अवकाळी पावसामुळे सोयाबीन तसेच शेंगदाण्याचे झालेले नुकसान, शेंगदाण्याची सुरू झालेली निर्यात तसेच पाम तेलावरील आयात शुल्कात झालेली वाढ अशा विविध कारणांनी खाद्य तेलाचे भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव १३० ते १४० रुपये तर शेंगदाण्याच्या तेलाचेही भाव १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. तसेच सूर्यफूल तेलाच्या भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईत खाद्यतेलानेही ‘तेल’ ओतले असून गृहिणींचे बजेट कोलमडत आहे.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाकघराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून खाद्य तेलाच्या भावात सातत्याने वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडका बसला आहे.
एरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाऱ्या या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे पाम तेलाचे भाव वाढले. पाम तेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तेलाचे त्यात अतिपावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने आवक कमी असल्यानेदेखील भाव वाढीस मदत होत असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय अवकाळी पावसाचाही परिणाम होऊन सोयाबीन, शेंगदाण्याचे पीक खराब झाले. या सर्वांचा परिणाम भाववाढीत होत आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ
गेल्या वर्षाचे खाद्य तेलाचे भाव पाहता यंदा त्यात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १०५ रुपये प्रति किलो असलेले सोयाबीन तेल सध्या १३० ते १४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. या शिवाय गेल्या वर्षी १४५ रुपये प्रति किलो असलेले शेंगदाणा तेल आता १८० ते १९० रुपये प्रति किलो, १३० रुपये प्रति किलो असलेले सूर्यफूल तेल १६० ते १६५ रुपये, २०० रुपये प्रति किलो असलेले तीळ तेल यंदा २४० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.
खाद्यतेलाचे दर (प्रती किलो)
तेल मार्च २०२१ मार्च २०२०
सोयाबीन १४० १०५
सूर्यफूल - १६५ १३०
शेंगदाणा - १९० १४५
तीळ २४० २००
खाद्य तेलाच्या भावात गेल्या दोन महिन्यांपासून वाढ होत आहे. अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाल्याने आवकवर परिणाम होऊन तेलाचे भाव वाढत आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
आता बिनफोडणीची भाजी
आधीच वाढत्या महागाईने चिंता वाढत असताना गेल्या काही दिवसांपासून तर खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे काय खावे आणि काय नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काटकसर करून किती करणार, दररोज जे आवश्यक आहे, ते तर घ्यावेच लागते.
- लता बारी, गृहिणी
गेल्या वर्षापासून एक तर कोरोनामुळे व्यवहार ठप्प राहण्यासह सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यात महागाई वाढतच असून खाद्य तेलाचा वापर कमी-कमी करावा लागत आहे.
- उषा चौधरी, गृहिणी
कोरोनामुळे वाढलेला आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर, आवाक्याबाहेर जाणारे गॅस सिलिंडरचे दर यामुळे जगावे कसे असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात दररोज लागणाऱ्या खाद्य तेलाचे भाव भरमसाठ वाढल्याने घरातील खर्चाचा सर्व ताळमेळ कोलमडत आहे. तेलाचा वापर नसल्या सारखाच करावा लागत आहे.
- उज्ज्वला पाटील, गृहिणी