आयात शुल्क वाढल्याने खाद्य तेलाला महागाईचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:53 PM2018-03-12T12:53:31+5:302018-03-12T12:53:31+5:30
१५ टक्यावरून ३० टक्यांवर शुल्क
विजयकुमार सैतवाल / आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १२ - सर्वात कमी दर असलेल्या पाम तेलाचे आयात शुल्क दुप्पट होण्यासह सोयाबीनच्या दरातही प्रति क्विंटल १२०० ते १३०० रुपयांनी वाढ झाल्याने पाम व सोयाबीन या खाद्य तेलाच्या दरात प्रति किलो सात ते आठ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे गृहिणींचे ‘बजेट’ कोलमडले आहे. दिलासादायक बाब म्हणजे शेंगदाणा तेल मात्र स्थिर आहे.
दररोज प्रत्येक घर तसेच खाद्य पदार्थांच्या व्यवसायातील अविभाज्य घटक असलेल्या तेलाचे भाव वाढल्यास त्याचा मोठा परिणाम स्वयंपाक घराच्या ‘बजेट’वर होत असतो. गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ चढ-उतार असलेल्या खाद्य तेलाच्या भावात आठवडाभरातच थेट सात ते आठ रुपये प्रति किलोने वाढ होऊन महागाईचा चांगलाच तडका बसला आहे.
आयात शुल्क दुप्पट
एरव्ही पाम तेलाचे भाव इतर तेलाच्या तुलनेत कमीच असतात. मलेशियामधून आयात होणाºया या तेलावर पूर्वी आयात शुल्क १५ टक्के होते, त्यात थेट दुप्पट वाढ होऊन ते ३० टक्के झाले आहे. यामुळे गेल्या आठवड्यात पाम तेलाचे ६८ ते ७० प्रति किलो असलेले भाव आता ७८ रुपये प्रति किलोवर पोहचले आहे.
सोयाबीन तेलाच्या भावावरही परिणाम
सर्वात कमी भाव असलेल्या पाम तेलाचे भाव सोयाबीन तेलाच्या भावापर्यंत पोहचल्याने त्याचा परिणाम होऊन सोयाबीन तेलाचेही भाव कडाडले आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलाचे भाव ७८ ते ८० रुपये प्रति किलो होते ते आता ८५ रुपयांवर पोहचले आहे. सोयाबीन तेलाचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक भाव असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. यापूर्वी हे भाव जास्तीत जास्त ८३ ते ८४ रुपये प्रति किलोवर पोहचले होते.
सोयाबीनचे दर दीडपट
पाम तेलाच्या आयात शुल्कात वाढ होण्यापाठोपाठ आता देशातच तयार होणाºया सोयाबीन तेलाच्या बियाण्यांच्या भावातही दीडपट वाढ झाली आहे. पूर्वी २७०० ते २८०० रुपये प्रति क्विंटल असलेले सोयाबीन आता ४००० रुपये प्रति क्विंटल झाले आहे. त्यामुळेही सोयाबीन तेलाचे भाव जास्त वाढण्यास मदत झाल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात या सर्व घडामोडी एकापाठोपाठ झाल्याने त्याचे परिणाम आता तेलाच्या भाव वाढीतून दिसून येत असल्याचेही व्यापाºयांनी स्पष्ट केले.
वेफर्स, फरसानसाठी पाम तेलाचा वापर वाढला
जास्त दिवस ठेवण्यात येणारे कोरडे खाद्य पदार्थ तयार करण्यासाठी सोयबीन तेलाचा वापर केल्यास त्या पदार्थांचा येण्यास सुरुवात होते. त्यामुळे यासाठी आता पाम तेलाच्या वापरावर भर दिला जात आहे. अशाच प्रकारे वेफर्स व फरसान तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर वाढल्याने त्याची मागणी वाढली व भावदेखील वाढत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे.
शेंगदाणा तेल (११२ ते ११५ रुपये प्रति किलो) व तीळाच्या तेलाचे भाव (१६० रुपये प्रति किलो) मात्र स्थिर आहे.
पाम तेलाच्या आयात शुल्कात वाढ व सोयाबीनचे दर वाढल्याने पाम तसेच सोयाबीन तेलाच्या भावामध्ये सात ते आठ रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे.
- पंकज देवपुरा, तेल व्यापारी, जळगाव.