लाच घेणाऱ्या अभियंत्यासह दोघांना शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 01:01 PM2018-11-04T13:01:31+5:302018-11-04T13:02:23+5:30

पंचांच्या साक्ष महत्त्वपूर्ण

Educating both with the bribe engineer | लाच घेणाऱ्या अभियंत्यासह दोघांना शिक्षा

लाच घेणाऱ्या अभियंत्यासह दोघांना शिक्षा

Next
ठळक मुद्देपाचोरा येथे इशा-यावर स्विकारली होती रक्कमतीन वेळा केला इशारा

जळगाव : वीज बील दुरुस्त करुन देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरण कंपनीचे पाचोरा येथील सहायक अभियंता जितेंद्र कडुबा गोरे व कनिष्ठ तंत्रज्ञ ऋषीकेश भिकन सूर्यवंशी यांना न्यायालयाने शनिवारी अनुक्रमे ४ व ३ वर्ष कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोहारा, ता.पाचोरा येथील शांताराम दगडू बेलदार यांच्या दुकानाचे वीज बील जादा आले होते. ते दुरुस्त करुन मिळावे यासाठी ते पाचोरा येथे महावितरणचे सहायक अभियंता जितेंद्र कडुबा गोरे यांच्याकडे गेले होते. गोरे यांनी बील दुरुस्त करुन देण्यासाठी बेलदार यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती.
त्यामुळे बेलदार यांनी ९ जानेवारी २०१५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अतिशय पद्धतशिरपणे सापळा रचून या विभागाने ही कारवाई केली.
तीन वेळा केला इशारा
तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक आर.पी.माळी दोन शासकीय पंचांना घेऊन पाचोरा उपविभागीय कार्यालयात गेले होते. तेव्हा गोरे यांनी एक बोट दाखवून एक हजार रुपये देण्याची मागणी केली.
त्यानंतर थोड्यावेळाने शेजारी बसलेले कनिष्ठ तंत्रज्ञ सूर्यवंशी यांच्याकडे ही रक्कम देण्याचा इशारा केला होता. थोड्यावेळाने सूर्यवंशी यांनीही एक हजार रुपये डाव्या खिशात टाकण्याचा बोट दाखवून इशारा केला. पैसे दिल्यानंतर जागेवरच पंचनामा करण्यात आला.
पंचाच्या साक्षी महत्वपूर्ण
न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकारतर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. तक्रारदार शांताराम बेलदार, पंच सुजय लांडगे (जि.प.जळगाव), खटला दाखल करण्यासाठी परवानगी देणारे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक डॉ.मुरहरी सोपानराव केळे (मुंबई) व तपासाधिकारी आर.पी. माळी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे यांनी प्रभावीपणे युक्तीवाद केला. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड.आर.के. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून अनिल रामचंद्र सपकाळे यांनी महत्वाची भूमिका यात बजावली.
असे कलम, अशी शिक्षा
जितेंद्र कडुबा गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक कलम ७ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्ष कैद. कलम १३ प्रमाणे ४ वर्ष कैद व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना कैद अशी शिक्षा दिली आहे. तसेच तंत्रज्ञ ऋषीकेश भीकन सूर्यवंशी याला लाचलुचपत प्रतिबंधक कलम १२ प्रमाणे ३ वर्ष शिक्षा, एक हजार रुपये दंड. दंड न भरल्यास १ वर्ष कैद अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

Web Title: Educating both with the bribe engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.