पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मिळतेय शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:30 PM2020-01-13T22:30:47+5:302020-01-13T22:30:53+5:30
नशिराबाद उर्दू जि़ प़ शाळा: विद्यार्थी घेत आहेत डिजीटल शिक्षण, दर्जेदार प्रयोगशाळेमुळे रूजतेय संशोधनाची आवड
सागर दुबे
जळगाव : केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, दफ्तराचे ओझे न बाळगता डिजिटलाइज शिक्षण मुलांना दिले जात आहे ते जळगाव नशिराबाद येथील नशिराबाद जिल्हा परिषद उर्दू केंद्र मुलांची शाळेत़ मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबविणारी ही शाळा प्रयोगशील शाळा ठरत आहे.
दरम्यान, विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत गावाचे नाव जिल्हाभरात उज्ज्वल करीत आहेत़ बोलक्या भिंती, विज्ञान प्रयोगशाळा लक्ष वेधून घेतात़ लोकसहभागातून शाळेचा कायापालट झाला आहे़
१ सप्टेंबर १८८१मध्ये शाळेची स्थापना झाली. सध्या पहिली ते ७ वी ३४८ विद्यार्थी आहेत. शाळेत ४ एलईडी स्क्रीन, तीन टॅब, स्मार्ट बोर्ड, २ संगणक आहेत. २०१६मध्ये उपक्रमशील शाळा म्हणून गौरव झाला आहे़
त्याचबरोबर २०१८मध्ये प्रयोगशाळा कार्यान्वित होऊन त्यात ५२० प्रयोग आहेत. त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण झाली आहे़
विशेष म्हणजे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानातील उत्कृष्ट कार्याबाबत नशिराबाद उर्दू शाळेचा गौरव झाला आहे़ त्यामुळे वेगळा ठसा या शाळेने उमटविला आहे़
तसेच आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद उर्दू केंद्र्र मुलांची शाळा जळगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आली आहे. तसेच शाळा-सिध्दी मूल्यांकनात शाळेने अ दर्जा प्राप्त केला असून जिल्ह्यात नशिराबाद उर्दू शाळा ही आदर्श ठरत आहे़
२२ शाळांनी दिल्या भेटी
शाळेने आयएसओ मानांकनासह शाळा-सिध्दी मूल्यांकनात सुध्दा अ दर्जा प्राप्त केला आहे़ शाळेच्या कार्याचा लेखाजोखा पाहण्यासाठी तब्बल २२ शाळांनी ऊर्दू शाळेला भेटी दिल्या आहेत़ क्रीडा चषक स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकाविले आहे़ उत्कृष्ट प्रयोग शाळा तयार केली़ आहे़ त्याठिकाणी विविध प्रयोग विद्यार्थी करतात़ दर शनिवारी दफ्तरमुक्त उपक्रम राबवून दफ्तराचे ओझे कमी केले जाते़
शाळेला यांचे मिळतेय मार्गदर्शन
शाळेच्या यशस्वी वाटचालीसाठी शिक्षणाधिकारी बी़ जे़ पाटील, उपशिक्षणाधिकारी डी़ एम़ देवांग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख शरीफ शेख हनीफ, गटशिक्षणाधिकारी एस़ एस़ चौधरी, विस्तार अधिकारी खलील शेख, केंद्रप्रमुख मसूद शेख, जि़ल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती यमुना रोटे, विकास पाटील, जयश्री पाटील आदी़