जळगावात विश्वशांती रथाद्वारे दिला शिक्षण, बालमजुरी निर्मूलनाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:38 PM2018-05-14T12:38:57+5:302018-05-14T12:40:47+5:30
शोभायात्रेने वेधले लक्ष
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ - कृष्णगिरी धाम येथे होणाऱ्या चौमुखी पार्श्वनाथ भगवान प्रतिष्ठा महोत्सवाच्या जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या विश्वशांती रथ यात्रेचे जळगावात रविवारी आगमन झाले. या रथ यात्रेद्वारे विश्वशांतीसह सर्वांसाठी शिक्षण, बालमजुरी निर्मूलन, महिला सक्षणीकरण, वृक्ष संवर्धन असे विविध संदेश देण्यात आले. या रथाची शहरातून शोभायात्रा काढण्यात येऊन भगवंतांचा जयघोष करण्यात आला. या वेळी शेकडो समाजबांधवांनी रथाचे व १६ लाख नवकार मंत्राच्या जपाने सिद्ध कलशाचे दर्शन घेतले.
कृष्णगिरी शक्तीपीठाधीपती राष्ट्रसंत विद्यासागर, मंत्र शिरोमणी यतीवर्य प.पू. डॉ. श्री वसंतविजयजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात ३ ते ११ फेबु्रवारी २०१९ दरम्यान कृष्णगिरी धाम येथे चौमुखी पार्श्वनाथ भगवान प्रतिष्ठा महोत्सव साजरा होणार आहे. त्याच्या जनजागृतीसाठी ११ राज्यात विश्व शांती रथ यात्रा काढण्यात आली असून १२ रोजी रात्री दादावाडी येथे या रथ यात्रेचे आगमन झाले.
बॅण्ड, सुश्राव्य भजनासह शोभायात्रा
दुपारी १ ते चार वाजेदरम्यान हा रथ व कलश नेहरु चौकात भाविकांच्या दर्शनार्थ उभा होता. या ठिकाणी भाविकांनी दर्शन घेत ११ नवकार मंत्राचा जाप केला. त्यानंतर दुपारी साडे चार वाजता सकल जैन श्रीसंघाच्यावतीने नेहरू चौक येथून रथाच्या शोभायात्रेस सुरुवात झाली. नवीपेठ, टॉवर चौकमार्गे ही शोभायात्रा श्री वासूपूज्य जैन मंदिराजवळ पोहचली. शोभायात्रेदरम्यान बँड लावण्यात येऊन समाज बांधवांनी विविध सुश्राव्य भजन सादर केले. तसेच पार्श्वनाथ भगवान व प.पू. डॉ. श्री वसंतविजयजी महाराज यांचा या वेळी जयघोष करण्यात आला. रथामध्ये असलेल्या श्री पार्श्वनाथ भगवान यांच्या विलोभनीय मूर्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
शोभायात्रेच्या शुभारंभप्रसंगी शाकाहार सदाचारचे प्रणेता रतनलाल बाफना, भागचंद जैन, अजित रायसोनी, महेंद्र जैन, प्रदीप मुथा, महेंद्र कोठारी, अतुल जैन, विजया मल्हारा, अभय कोठारी आदी उपस्थित होते.
शोभायात्रा मंदिराजवळ पोहचल्यानंतर तेथे प्रथम बापजी महाराज समुदयाच्या साध्वी श्री हितोदया म.सा. आदी ठाणा ३ व सागर समूदयाच्या साध्वी श्री परागधर्म म.सा. आदी ठाणा ३ यांनी रथाचे दर्शन घेतले व त्यानंतर उपस्थित शेकडो समाजबांधवांनी दर्शन घेतले.