जादू- टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:35 PM2019-12-02T12:35:50+5:302019-12-02T12:36:20+5:30
अॅड.मुक्ता दाभोलकर : अंनिसच्या माध्यमातून जिल्ह्यातील ६०० मानसिक रुग्णांना दिला आधार
सचिन देव ।
जळगाव : समाजातील अंधश्रद्धा घालविण्यासाठी गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वेगाने काम सुरु आहे. कायदा झाल्यानंतर आतापर्यंत अंधश्रद्धेच्या नावाखाली राज्यभरात फसवणुकीचे ४५० च्या वर गुन्हे दाखल झाले आहेत. समाजातील सर्वच स्तराशी निगडीत असलेली अंधश्रद्धा घालविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असे मत अंनिसच्या राज्य पदाधिकारी अॅड. मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले.
रविवारी समता शिक्षक परिषदेतर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी त्या जळगावाल आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. त्यांच्याशी ही झालेली बातचीत.
प्रश्न : जिल्ह्यात अंनिसतर्फे सध्या कुठले काम प्रभावीपणे सुरु आहे?
उत्तर : जिल्ह्यातील ६०० च्या वर मनोरुग्णांवर उपचार करुन, त्यांना बरे करण्यात आले आहे. हे काम जिल्ह्यात चाळीसगाव येथे प्रभावीपणे काम सुरु आहे. अंनिसतर्फे डॉ. प्रदीप जोशी हे मनोरुग्णांवर मोफत उपचार करत आहेत. जिल्हाभरातील रुग्ण या ठिकाणी येत असतात. त्या रुग्णांवर उपचार करीत आहोत.
प्रश्न : नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत?
उत्तर : जादू-टोणा विरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार कायदा करण्यात आला आहे. त्याची शहर व ग्रामीण भागापर्यंत प्रभावी अंमल बजावणी करता येईल, याकडे नव्या सरकारने लक्ष द्यावे, मागील युतीच्या सरकारने अंधश्रद्धा निर्मुलनसाठी शााळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी परवानही दिली होती. तशी या नव्या सरकारनेही द्यावी,
प्रश्न : अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अंनिसतर्फे येत्या काळात कुठले उपक्रम राबविण्यात येणार आहेत?
उत्तर : कायदा लागू झाला असला तरी, अंधश्रद्धेच्या नावाखाली कुठेना-कुठे फसवणूकीचे प्रकार घडतातच. यासाठी अंनिसतर्फे मानस मित्र उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरुण-तरुणींना प्रशिक्षण देऊन, मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना मानसोपचार तज्ञांकडे नेऊन, त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
प्रश्न : अंनिसतर्फे महिला सबलीकरण अभियान घेण्यात येणार आहे, त्याचे स्वरुप नेमके काय आहे?
उत्तर : सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ३ ते १२ जानेवारी या कालावधीत अंनिसतर्फे महिलांच्या समस्या जाणून घेणार आहेत. शाळा, महाविद्यालये व ग्रामीण भागात जाऊन महिलांच्या मासिक पाळी संदर्भात गैरसमज दूर करणार आहेत.