कंटेन्मेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:21+5:302021-04-09T04:17:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रमाणात कंटेन्मेंट झोन तयार करून त्याची प्रभावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य प्रमाणात कंटेन्मेंट झोन तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच उपचार सुविधांचे नियोजन करताना होमक्वारंटाइन केलेल्या रुग्णांवर लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय पथकातील जोधपूर एम्सचे डॉ. श्रीकांत यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या आढावा बैठकीत डॉ. श्रीकांत बोलत होते. यावेळी पथकातील सदस्या डॉ अनुपमा बेहरे, एम्स, भुवनेश्वर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार उपस्थित होते.
डॉ. श्रीकांत यांनी प्रशासनामार्फत जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी कोविडच्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने योग्य पध्दतीने केले तर निश्चितच संसर्गवाढ थांबविता येईल, तसेच कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करावी, गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराबाबत योग्य पद्धतीने देखरेख होण्याबरोबरच त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच उपचार होणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक क्षेत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्त्यासह पोलीस दलाची मदत घ्यावी. लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन अधिक व्यापक प्रमाणात चाचण्या आणि लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.
गंभीर रुग्णांवर लक्ष ठेवल्यास मृत्यू रोखण्यात मदत - डॉ. बेहरे
डॉ. अनुपमा बेहरे म्हणाल्या की, कोरोना मृत्यू रोखण्यासाठी बाधित रुग्णांबरोबर कोमॉर्बिड रुग्णांवरही वेळीच योग्य ते उपचार करण्यात यावेत, क्रिटीकल रुग्णांवर विशेष लक्ष ठेवून उपचार केल्यास मृत्यू रोखण्यास मदत होईल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राऊत यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या बेड साईड असिस्टंट उपक्रमांची व इतर उपाययोजनांबाबतची सविस्तर माहिती यावेळी दिली. प्रशासनामार्फत कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात शहरी भागात ८२ तर ग्रामीणमध्ये ६० कन्टेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. तसेच कोरोना उपचार सुविधात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत असून ऑक्सिजन बेड, आयसीयू व इतर उपचार सुविधांची माहिती दिली.
ग्रामीण भागात राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जि.प.चे सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांनी तर महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली तर जिल्ह्यातील रुग्णवाढीचा दर, मृत्युदर, उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ, मास्क, पीपीई किट, लसींची उपलब्धता, ॲक्टिव्ह रुग्ण, सीसीसी, डिसीएचसी, डीसीएचमधील उपलब्ध खाटांची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी दिली.
बेड साईड असिस्टंट उपक्रमाचे कौतुक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या बेड साईड असिस्टंट उपक्रमाचे केंद्रीय पथकाने कौतुक करून एकदंरीत जिल्ह्यात प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त केले.
केंद्रीय पथकाचा पाच दिवसांचा दौरा
केंद्रीय पथक जिल्ह्याच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले असून, या दौऱ्यात ते जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तसेच नगरपालिका क्षेत्रात जाऊन कोरोना परिस्थितीची पाहणी करणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन स्थानिक प्रशासनाला काही मार्गदर्शक सूचनाही करणार आहे.