कोविडच्या परिणामाने रक्तसाठ्यावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:16 AM2021-03-16T04:16:38+5:302021-03-16T04:16:38+5:30
जळगाव: एकिकडे कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नसल्याने, दाते पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई निर्माण ...
जळगाव: एकिकडे कोरोनामुळे निर्बंध लावण्यात आल्याने मोठी रक्तदान शिबिरे घेता येत नसल्याने, दाते पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दोन महिने रक्तदान करता येणार नसल्याने सामान्यांना जेव्हा लसीकरण सुरू होईल, त्या आधी त्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सध्या स्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असून हे लसीकरण लवकर व्हावे,यासाठी केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. यात आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे.
९५०
जणांना सरासरी रोज लस दिली जात आहे
५१०७४
जणांना आजपर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
१०
ब्लड बँक एकूण जिल्ह्यात आहेत
अजून सामान्यांना लस नाही
पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षावरील ज्येष्ठ आणि ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. अद्याप सामान्य नागरिकांना लस दिली जात नसून साधारण महिनाभराच्या कालावधीनंतर सामान्यांचे लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत सामान्यांनी लस घेण्याआधी रक्तदान करावे, अन्यथा दोन महिने त्यांना रक्तदान करता येणार नाही.
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
१ शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाच्या दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी तुम्हाला रक्तदान करता येणार आहे. पहिला डोस व दुसरा डोस यात साधारण २८ दिवसांचे अंतर असल्याने लस घेतल्यानंतर दोन महिन्यांनींच तुम्हाला रक्तदान करता येणार आहे.
२ सामान्यांना जेव्हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात होईल तेव्हा त्यांनी लसीकरणाआधी रक्तदान करावे, असे आवाहन करता येईल, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तकेंद्राचे रक्मसंक्रमण अधिकारी डॉ. आकाश चौधरी यांनी सांगितले.
ब्लड बँक प्रमुख म्हणतात...
सध्या कॅम्प घेण्यावर निर्बंध आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या रक्तदान शिबिरांमधून पुरेसासाठा उपलब्ध झाला होता. मात्र, तो ३५ दिवस वापरता येऊ शकतो, त्यामुळे पुढील काही महिन्यात रक्तसाठ्याचा तुटवडा होऊ शकतो. दुसरीकडे अत्यावश्यक वगळून काही शस्त्रक्रिया बंद असल्याने क्ताची मागणी कमी आहे. रक्तदानासाठी मोठा कॅम्प न घेता, चार ते पाच लोक समूहाने कुठल्याही ब्लड बँकेत रक्तदान करू शकतात. सामान्यांना जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा त्यांनी लसीकरणाआधी रक्तदान करावे, कारण लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर नंतर दोन महिने रक्तदान करता येणार नाही.
- डॉ. आकाश चौधरी, रक्तसंक्रमण अधिकारी, रक्त केंद्र, जीएमसी.
सर्वच ब्लड बँकमध्ये सध्या साठा कमी आहे. त्यातच आता कोविडमुळे कॅम्प होत नसल्याने कलेक्शन खूपच कमी आहे. सध्या आपल्याकडे ८० बॅगा उपलब्ध आहेत. त्या निगेटिव्ह ग्रुप नाही. आठ दिवस पुरेल एवढा हा रक्तसाठा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण जेव्हा, सामान्यांना सुरू होईल, तेव्हा त्यांनी आधी रक्तदान केल्यास तुटवडा जाणवणार नाही. कारण कोविडच्या निर्बंधांमुळे सध्या मोठे कॅम्प घेता येत नसल्याने उन्हाळ्यात रक्तसाठ्याचा तुटवडा भासू शकतो.
- अर्जुन राठोड, गोळवलकर रक्तपेढी