सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:55+5:302020-12-12T04:32:55+5:30

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ लोकमत न्यूज नेटवर्क अजय पाटील जळगाव : गेल्या काही ...

Effects on cold due to continuous storms | सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

सातत्याने निर्माण होणाऱ्या वादळांमुळे थंडीवर परिणाम

Next

हवामान बदलाचा परिणाम : हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

अजय पाटील

जळगाव : गेल्या काही वर्षांपासून हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने त्याचा परिणाम जवळपास प्रत्येक ऋतूवर होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात नोव्हेंबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान बंगालचा उपसागर असो वा अरबी समुद्र या भागात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीच्या प्रमाणात घट होत आहे. आता पुन्हा दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रवाती क्षेत्र विकसित होत असून, यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन थंडीत घट झाली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात तीन लहान-मोठे वादळे निर्माण झाली. यामुळे नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीला वाढलेली थंडी महिनाभरापासून गायब झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर-मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाली होती; मात्र त्यानंतर बंगालच्या उपसागरात महिनाभरात तीन वादळे निर्माण झाली आहेत. यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या पूर्णपणे ब्रेक लागला.

हिवाळ्यातील किमान तापमानात ३ अंशाची वाढ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी या चार महिन्यांचा विचार केल्यास किमान तापमानाची सरासरी ही १४ अंश इतकी असते; मात्र गेल्या दोन वर्षांपासून या सरासरीत वाढ होत आहे. २०१८ मध्ये किमान तापमानाची सरासरी १६ अंश होती. तर २०१९ मध्ये हीच सरासरी १७ अंश इतकी होती. तीन वर्षात हिवाळ्यातील किमान तापमानाच्या सरासरीत ३ अंशाची वाढ झाली आहे. यामुळे रब्बी हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमानाची सरासरी

वर्ष - किमान तापमानाची सरासरी

२०१६ - १३

२०१७ - १४

२०१८ - १६

२०१९ - १७

२०२० - १७

समुद्राच्या तापमानात वाढ

हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. जागतिक तापमान वाढले असून, समुद्राच्या तापमानातदेखील वाढ झाली आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याचा पातळीवरचे तापमान वाढले आहे. समुद्राच्या १० ते १२ अंक्षांशावर व ८२ रेखांश वर पाण्याचे तापमान वाढल्याने सातत्याने चक्रीवादळे निर्माण होत आहेत.

कोट..

हवामान बदलामुळे चक्रीवादळे निर्माण होत आहे. यामुळे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उत्तरेकडून येणारे थंड वारे रोखले जात आहेत. याचा परिणाम म्हणून थंडी गायब झाली आहे. भविष्यात हा प्रकार नियमित होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात गेल्या महिन्यात तीन चक्रीवादळे निर्माण झाले होते. त्यानंतर अरबी समुद्रात नव्याने चक्रीवादळ निर्माण होत आहे.

-डॉ. रामचंद्र साबळे, हवामान तज्ज्ञ, पुणे वेधशाळा

Web Title: Effects on cold due to continuous storms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.